तापमान

हवेच्या विविध अंगापैकी तापमान हा घटक महत्वपूर्ण असून हवेच्या इतर अंगावर (वायूभार, वारे, वृष्टी) परिणाम करीत असल्यामुळे त्याला ‘नियंत्रण’ घटक असेही म्हणतात. सूर्यकिरणामुळे प्रत्यक्ष हवा तापत नाही. प्रथम सौरशक्ती पृथ्वीपृष्ठभागाला मिळते. त्यानंतर भूपृष्ठापासून उत्सर्जित होणाऱ्या उष्णतेपासून वातावरणातील हवा तापते. हवेचे भूपृष्ठालगतचे थर अगोदर तापतात नंतर वरचे थर तापतात. वातावरणात तापण्यासाठी वहन उत्सर्जन व अभिसरण या क्रियांचा वापर होत असतो.

सूचना: संपूर्ण भूगोल अभ्यासण्यासाठी कृपया खालील बटनावर क्लिक करा.

हवेचे तापमान मोजण्यासाठी साधा तापमापक, कमाल व किमान तापमापक व तापमान लेखक या उपकरणांचा वापर केला जातो. हवेचे तापमान अंश, फॅरेनाईट व अंश सेल्सियसमध्ये मोजले जाते. हवेच्या तापमानावर हवेचा दाब, बाष्पीभवन, आर्द्रता, वारे, ढग, वृष्टी इत्यादी घटक अवलंबून असतात. सर्व सजीवसृष्टीला जगण्यासाठी व विकसित होण्यासाठी तापमानाची आवश्यकता असते, म्हणून हवेच्या तापमानाचा अभ्यास महत्वपूर्ण ठरतो.

हवेच्या तापमानावर परिणाम करणारे घटक :

पृथ्वीवर सर्वत्र हवेचे तापमान सारखे आढळत नाही. कारण हवेच्या तापमानावर अनेक घटकांचा परिणाम होतो. हवेच्या तापमानावर परिणाम करणारे घटक पुढीलप्राणे आहेत.

अक्षांश :

पृथ्वीवरील अक्षांशानुसार तापमान बदलत जाते. विषुवृत्तापासून उत्तर व दक्षिण धु्रवाकडे जाताना तापमान कमी कमी होत जाते. कारण विषुवृत्तीय प्रदेशात संपूर्ण वर्षभर सूर्यकिरणे लंबरुप पडतात व कमी जागा व्यापत असल्यामुळे सौरशक्ती जास्त मिळून हवेचे तापमान वाढते. परंतू विषुवृत्तापासून दोन्ही धु्रवाकडे सूर्यकिरणे तिरपी होत जातात. तिरपी सूर्यकिरणे जास्त जागा व्यापत असल्यामुळे मिळणाऱ्या सौरशक्तीचे प्राण कमी असते. त्यामुळे कमी उष्णता मिळाल्याने हवेचे तापमान कमी असते.

समुद्रसपाटीपासून उंची :

पृथ्वीला मिळणाऱ्या उष्णतेपासून हवा खालून वर तापत जाते. त्यामुळे समुद्रसपाटीलगत तापमान जास्त असते. तर समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जावे तसतसे तापमान कमी होत जाते. सर्वसाधारणपणे १६० मीटर उंचीला १ अंश से.ग्रे. तापमान कमी होते. त्यामुळे वाई येथे तापमान जास्त आढळते. तर जास्त उंचीवरील महाबळेश्वर व पाचगणी येथे तापमान कमी आढळते. उंचीनुसार हवेचा दाब कमी झाल्यामुळे हवेचे प्रसरण होऊन तापमान कमी आढळते. वातावरणाच्या खालच्या थरात धुलीकण व बाष्प जास्त असल्यामुळे उष्णता जास्त ग्रहण केली जाते. त्यामुळे तापमान जास्त असते. परंतू समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जावे तसतसे धुलीकण बाष्प व वायुंचे प्राण कमी झाल्यामुळे तापमान कमी असते.

समुद्रसानिध्य :

समुद्रसानिध्याचा परिणाम हवेच्या तापमानावर होतो. समुद्रालगत असणाऱ्या हवेचे तापमान कमी असते, तर समुद्रापासून जसजसे दूर जावे तसतसे तापमान वाढत जाते. पाणी उशीरा तापत असल्यामुळे दिवसा तापमान कमी असते. तर पाणी सावकाश थंड होत असल्यामुळे रात्रीचे तापमान फारसे कमी होऊ दिले जात नाही. समुद्रकिनाऱ्याच्या प्रदेशात दिवसाच्या समुद्राकडून जमिनीकडे वाहणाऱ्या खाऱ्या वाऱ्यामुळे व रात्री जमिनीवरुन समुद्राकडे वाहणाऱ्या मतलई वाऱ्यामुळे तापमान सम रहाते. मात्र समुद्रापासून दूर अंतरावर या सागरी वाऱ्याचा व समुद्रसानिध्याचा प्रभाव पडत नाही, म्हणून समुद्रापासून जसजसे दूर जावे, तसतसे तापमान वाढते. समुद्रसानिध्य लाभलेल्या मुंबईचे तापमान कमी असून खंडान्तर्गत प्रदेशात असणाऱ्या नागपूरचे तापमान मात्र जास्त आहे.

प्रचलित वारे :

एखाद्या प्रदेशात विशिष्ठ काळ एकाच प्रकारचे वारे वाहत असतील तर त्यांचा परिणाम हवेच्या तापमानावर होत असतो. असे वारे थंड प्रदेशावरुन येत असतील तर तापमान कमी केले जाते. परंतू जर हे वारे उष्ण प्रदेशाकडून येत असतील तर तापमान वाढविले जाते. नैऋत्य मौसमी वारे समुद्रावरुन येत असल्यामुळे भारतातील हवेचे तापमान कमी होण्यास मदत होते.

समुद्रप्रवाह :

समुद्रातून उष्ण व थंड सागरी प्रवाह वाहत असतात. या समुद्रप्रवाहांच्या लगतच्या प्रदेशाच्या तापमानावर परिणाम होतो. उष्ण प्रवाहामुळे तापमान वाढते, तर शीत प्रवाहामुळे तापमान कमी होते. उष्ण प्रवाहावरुन वाहणारे वारे उष्ण असतात. त्यामुळे लगतच्या प्रदेशाचे तापमान वाढवितात. संयुक्त संस्थानच्या पूर्व व आग्नेय किनाऱ्याजवळून गल्फ स्ट्रीम हा उष्ण प्रवाह वाहत असल्यामुळे किनाऱ्याचे तापमान वाढते. शीत प्रवाहावरुन वाहणारे वारे थंड असतात. या प्रवाहावरुन जमिनीकडे येणाऱ्या वाऱ्यामुळे तापमान कमी केले जाते. कॅनडाच्या ईशान्य किनाऱ्याजवळून लॅब्राडोर शीत प्रवाह वाहत असल्यामुळे किनारी प्रदेशाचे तापमान कमी झाले आहे.

ढगांचे आच्छादन :

आकाश ढगाने अभ्राच्छादित असल्यास सौरशक्तीच्या परावर्तनाचे प्राण वाढते. त्यामुळे भूपृष्ठाला कमी सौरशक्ती मिळते व तापमान कमी असते. याउलट ज्या प्रदेशात आकाश निरभ्र असते. त्या भागात सूर्यकिरणे जमिनीपर्यंत पोहचत असल्यामुळे तापमान जास्त आढळते.

पर्जन्य :

जास्त पर्जन्याच्या प्रदेशातील बरीचशी उष्णता ओलसर जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन करण्यात खर्च होते. त्यामुळे हवेचे तापमान कमी असते. याउलट कमी पर्जन्याच्या प्रदेशातील जमिन कोरडी असल्यामुळे तापमान जास्त असते.

वनस्पतींचे आच्छादन :

घनदाट जंगलाच्या प्रदेशात सूर्यकिरणे जमिनीपर्यंत पोहचण्यास अडथळा होतो. त्यामुळे जमीन फारशी तापत नाही. तसेच वनस्पतीद्वारे होणाऱ्या बाष्प उत्सर्जनामुळे हवेची आर्द्रता जास्त असते. हवेतील हे बाष्प उष्णतेचे शोषण करीत असल्यामुळे हवेचे तापमान फारसे वाढत नाही. याउलट नैसर्गिक वनस्पतीचे आच्छादन नसलेल्या वाळवंटी प्रदेशात तापमान जास्त असते.

मृदा प्रकार व रंग :

वाळुमिश्रीत खडकाळ जमिन सौरशक्ती जास्त शोषून घेत असल्यामुळे अशा प्रदेशात हवेचे तापमान जास्त असते. याउलट गाळाची व चिकणमातीची मृदा कमी सौरशक्ती शोषून घेते त्यामुळे त्याठिकाणचे तापमान कमी असते.

जमिनीचा उतार :

जमिनीचा दक्षिणेकडील उतार व उत्तरेकडील उतार येथील तापमानात भिन्नता आढळते. सूर्यकिरणांच्या दिशेने भूपृष्ठाचा उतार असल्यास ती लंबरुप पडल्यामुळे कमी जागा व्यापतात त्यामुळे जास्त उष्णता मिळाल्यामुळे तापमान जास्त असते. मात्र सूर्यकिरणांच्या विरुद्ध दिशेने उतार असल्यास सूर्यकिरणे जास्त जागा व्यापतात, त्यामुळे कमी उष्णता मिळते. सहाजिकच अशा प्रदेशाचे तापमान कमी असते.