डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बालपण व शिक्षण

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर उर्फ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेशातील महू या गावी अस्पृश्य समजल्या गेलेल्या महार जातीत झाला. त्यांचे संपूर्ण नाव भीमराव रामजी सकपाळ असे होते.

 • बाबासाहेबांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण दापोली, सातारा, मुंबई अशा निरनिराळ्या गावी झाले. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी जिद्द न सोडता आपले शिक्षण चालू ठेवले.
 • इ.स. १९०७ मध्ये मुंबईच्या एलफिंस्टन हायस्कूलमधून ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी मुंबईच्या एलफिस्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला. येथूनच ते १९१२ मध्ये बी.ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले.
 • इ.स. १९१३ मध्ये सयाजीराव गायकवाड यांच्या आर्थिक सहाय्यामुळे बाबासाहेब उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेले. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी एम. ए. आणि पी. एच. डी. या पदव्या संपादन केल्या. त्यानंतर पुढील अध्ययनासाठी ते इंग्लडला गेले; परंतु आर्थिक अडचणींमुळे इ.स. १९१७ मध्ये त्यांना भारतात परत यावे लागले.
 • छत्रपती शाहू महाराजांनी दिलेल्या आर्थिक मदतीमुळे इ.स. १९२० मध्ये आंबेडकर पुन्हा इंग्लंडला गेले. तेथे त्यांनी प्रथम अर्थशास्त्रात बी.एस.सी. ची पदवी संपादन केली.
 • त्यानंतर त्यांच्या ‘दि प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या प्रबंधाबद्दल लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सने त्यांना डी.एस.सी. ही पदवी बहाल केली. इंग्लंडमधील या वेळच्या वास्तव्यात बाबासाहेब बॅरिस्टर देखील झाले.
सार्वजनिक कार्य
 • इ.स. १९२० पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सामाजिक जीवनात भाग घेऊ लागले. मुंबई हायकोर्टामध्ये ते वकिलीचा व्यवसाय करु लागले. त्यांनी साऊथबरो समितीसमोर दलितांची बाजू मांडून आपल्या कार्यांची सुरुवात केली.
 • भारतात परतल्यावर आंबेडकरांनी काही काळ बडोदा संस्थानात नोकरी केली; परंतु त्यांना अस्पृश्यतेबाबत तेथे आलेल्या कटू अनुभवामुळे त्यांनी त्या नोकरीचा त्याग केला.
 • मुंबईच्या सिडनेहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स व इकॉनॉमिक्समध्ये, अर्थाास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली.
 • कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांच्याकडून मिळालेल्या मदतीच्या आधारे बाबासाहेबांनी इ.स. १९२० मध्ये ‘मूकनायक’ नावाचे पाक्षिक सुरु केले.
बहिष्कृत हितकारिणी सभा
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांमध्ये त्यांच्या हक्कांबाबत जागृती करण्यासाठी व त्यांना संघटित करण्यासाठी २० जुलै १९२४ रोजी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली.
 • दलित समाजात शिक्षणाचा प्रसार घडवून आणणे, दलितांची सांपत्तिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करणे आणि शिक्षणाच्या माध्यमातून त्यांच्यात जागृती घडवून आणणे ही या संस्थेची प्रमुख उद्दिष्ट्ये होती. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अस्पृश्यांसाठी अनेक शाळा व वस्तीगृहे सुरु केली.
अस्पृश्यता निर्मूलनाचे लढे
 • बाबासाहेबांनी १९ व २० मार्च १९२७ रोजी महाड येथे चवदार तळ्यावर सत्याग्रह केला.
 • बाबासाहेब आंबेडकरांनी २५ व २६ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथील परिषदेत मनुस्मृती या ग्रंथाचे जाहिररीत्या दहन केले.
 • त्यांनी १३ ऑक्टोबर १९२९ रोजी पुणे येथे पर्वती मंदिर सत्याग्रह सुरु केला.
 • नाशिक येथील काळाराम मंदिरात प्रवेश मिळविण्यासाठी ३ मार्च १९३० रोजी सत्याग्रहाला प्रारंभ झाला. या सत्याग्रहाचे नेतृत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले, हा लढा १९३५ पर्यंत चालू होता.
राजकीय कार्य
गोलमेज परिषदा व पुणे करार
 • इंग्लंडच्या सरकारने भारताच्या घटनात्मक प्रश्नासंबंधी विचारविनिमय करण्यासाठी इ.स. १९३० ते १९३२ च्या दरम्यान तीन गोलमेज परिषंदाचे आयोजन केले होते. या परिषदांना अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना निमंत्रित करण्यात आले होते.
 • या वेळी त्यांनी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली. अस्पृश्यांसाठी वेगळे मतदारसंघ असल्याखेरीज या समाजात त्यांना कायदेमंडळावर प्रतिनिधित्व मिळणार नाही असे त्यांचे मत होते.
 • दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या वेळी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाच्या प्रश्नावरुन बाबासाहेबांचे गांधींसोबत मतभेदही झाले होते. ब्रिटीश पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी १६ ऑगस्ट १९३२ रोजी आपल्या जातीय निवाडा जाहीर केला. या निर्णयानुसार मुसलमान, अस्पृश्य, शीख, ख्रिश्चन या सर्वांना अल्पसंख्याक समजून त्यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याची घोषणा केली.
 • स्वतंत्र मतदारसंघाच्या निर्णयाविरुद्ध गांधीनी २० सप्टेंबर १९३२ रोजी येरवड्याच्या कारागृहात आमरण उपोषण सुरु केले.
 • शेवटी बाबासाहेबांनी बहूजन समाजावर होणाऱ्या दूरगामी परिणांमाच्या विचार करुन २४ सप्टेंबर १९३२ रोजी पुणे करारावर सही केली.
 • या करारानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाचा त्याग करुन त्यांच्या मनाविरुद्ध राखीव जागांचा स्विकार केला.
राजकीय पक्ष
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १५ ऑगस्ट १९३६ रोजी ‘स्वतंत्र मजूर पक्ष’ या आपल्या पहिल्या राजकीय पक्षाची स्थापना केली.
 • इ.स. १९३७ मध्ये मुंबई कायदेमंडळात १५ पैकी ११ जागा स्वतंत्र मजूर पक्षाने जिंकल्या होत्या. इ.स. १९३७ ते १९३९ या काळात स्वतंत्र मजूर पक्षाच्या आमदारांनी मुंबई कायदेमंडळात उत्कृष्ट कार्य केले.
 • बाबासाहेबांनी १७ सप्टेंबर १९३७ रोजी खोती पद्धती व महार वतन नष्ट करण्यासंबंधीचे विधेयक मुंबई कायदेमंडळात मांडले. शेतकरी आणि कामगारांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न स्वतंत्र मजूर पक्षाने केला. त्यांच्या या कार्यामुळेच १९४२ मध्ये बाबासाहेबांना मजूर मंत्री म्हणून गव्हर्नर जनरलने आपल्या मंत्रीमंडळात घेतले.
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी आपल्या कार्याचा स्तर राष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी १९ जुलै १९४२ रोजी ‘अखिल भारतीय शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन’ या नव्या पक्षाची स्थापना केली.
 • स्वातंत्रपूर्व काळातील १९४६ च्या निवडणूकीत, पुढे १९५२ च्या सार्वत्रिक निवडणूकीत आणि १९५४ च्या पोटनिवडणूकीत शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाला.
 • बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लीकन पक्ष स्थापन करण्याचा संकल्प केलेला होता. परंतु त्यांचा हा संकल्प त्यांच्या हयातीत पूर्ण होऊ शकला नाही. त्यांच्या परिनिर्वाणानंतर १९५७ मध्ये रिपब्लीकन पक्ष अस्तित्वात आला.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री होते.
 • घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्षपद स्विकारुन स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार करण्याचे मौलिक काम त्यांनी केले.
 • २६ नोव्हेंबर १९४९ रोजी ही राज्यघटना स्वीकृत झाली व राज्यघटनेची अंमलबजावणी २६ जानेवारी १९५० पासून सुरु झाली.
 • सर्व हिंदू कायद्याचे संहितीकरण करुन सर्व हिंदूना एकच कायदा लागू करावा व त्यात हिंदू स्त्रियांना समान हक्क देण्यात यावेत, यासाठी कायदा मंत्री म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाचा मसुदा तयार करुन लोकसभेत मांडला.
 • सरदार वल्लभभाई पटेल आणि राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी विधेयकाला विरोध केला. पंडित नेहरुंनी प्रारंभी विधेयकास पाठिंबा दिला असला तरी शेवटी तेही आपल्या निर्णयाशी ठाम राहिले नाहीत. परिणामी हे विधेयक लोकसभेत मंजूर होऊ शकले नाही. बाबासाहेब आंबेडकर त्यामुळे खूप निराश झाले. अखेर त्यांनी निराश होऊन १९५१ मध्ये आपल्या कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
शैक्षणिक कार्य
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना शिका, संघटित व्हा व संघर्ष करा हा महत्त्वाचा संदेश दिला.
 • शिक्षणामुळे दलितांची स्पृश्यांच्या सामाजिक व धार्मिक गुलामगिरीतून सुटका होण्यास मदत होणार होती त्यामुळे बाबासाहेबांनी बहिष्कृत हितकारिणी सभेच्या माध्यमातून वसतिगृहे, वाचनालये व प्रौढांसाठी रात्रीच्या शाळा सुरु केल्या.
 • दलित व बहुजनांच्या शिक्षणासाठी बाबासाहेबांनी इ.स. १९४५ मध्ये मुंबई येथे ‘पीपल्स एज्युकेान सोसायटीची’ स्थापना केली. या सोसायटीने २० जून १९४६ मध्ये मुंबईला सिद्धार्थ कॉलेज, तर १९ जून १९५० रोजी औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय सुरु केले.
 • मराठवाडा विभागासाठी स्वतंत्र विद्यापीठ असावे असे बाबासाहेबांना वाटत होते त्यामुळे त्यांनी औरंगाबादला मराठवाडा विद्यापीठ स्थापन करण्यात पुढाकार घेतला. पुढे इ.स.१९५८ साली औरंगाबादला मराठवाडा विद्यापीठ स्थापन झाले.
पत्रकारिता
 • त्यांनी इ.स. १९२० मध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या आर्थिक सहाकार्यामुळे ‘मूकनायक’ हे पाक्षिक सुरु केले. इ.स. १९२३ मध्ये हे पाक्षिक बंद पडले.
 • ३ एप्रिल, १९२७ रोजी बाबासाहेबांनी ‘बहिष्कृत भारत’ हे वृत्तपत्र सुरु केले. बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र १९३० पर्यंत चालले.
 • डॉ. बी.आर. आंबेडकरांनी आपली चळवळ समाजापर्यंत नेण्यासाठी ‘समता’, ‘जनता’ व ‘प्रबुद्ध भारत’ ही वृत्तपत्रे सुरु केली. या वृत्तपत्रातून त्यांनी अस्पृश्यांचे राजकीय प्रश्न भ़ारतीय राजकारणाच्या ऐरणीवर आणले.
आर्थिक क्षेत्रातील योगदान
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या राजकीय व शैक्षणिक क्षेत्रांबरोबर आर्थिक क्षेत्रातही भरीव असे योगदान दिले आहे. त्यांनी आपल्या प्रमुख पदव्या अर्थशास्त्रात घेतल्यामुळे त्यांनी भारतीय सामाजिक व आर्थिक स्थिती चांगली माहिती होती. त्यांच्या अर्थशास्त्रीय वाचनामूळे व त्यातून त्यांनी केलेल्या कृतीमूळे त्यांची गणना भारताच्या प्रमुख अर्थतज्ञामध्ये होते.
 • १९४२ ते १९४६ च्या दरम्यान व्हॉईसरॉयच्या मंत्रीमंडळात मजूरमंत्री असताना त्यांनी अनेक आर्थिक उपक्रम हाती घेतले. त्यांनी हिराकूड धरण, दामोदर धरण प्रकल्प, विजेचा प्रश्न, नद्याजोडण्याचा प्रकल्प, जलसिंचनाच्या सोयी इत्यादी अनेक प्रकल्प हाताळले. त्यांनी या काळात व नंतर आपली अर्थशास्त्रीय भूमिका नेहमीच बजावली.
बौद्ध धर्माचा स्वीकार – १९५६
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. त्यांनी अस्पृश्यांच्या उद्धारासाठी आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी आयुष्यभर लढा दिला, परंतु स्पृश्य हिंदू लोकांवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही.
 • ज्या हिंदू धर्मात अस्पृश्यांना समाज व माणुसकीची वागणूक दिली जात नाही, त्या धर्मात राहून अस्पृश्यता गुलामगिरी शिवाय काहीही मिळणार नव्हते. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी नाशिक जिल्ह्यात येवला येथे धर्मांतर करण्याचा निर्णय घेतला आणि समतेवर व वैज्ञानिक दृष्टीकोनावर आधारलेला बौद्ध धर्म स्वीकारण्याचे ठरविले.
 • १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे बाबासाहेबांनी पत्नी डॉ. सविता व आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.
 •  डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे परिनिर्वाण झाले.