चाफेकर बंधू

चाफेकर बंधूचे क्रांतीकार्य

इ.स. १८९६ मध्ये दामोदर, बाळकृष्ण, वासुदेव हे चाफेकर बंधू तसेच दामुअण्णा भिडे, महादेव विनायक रानडे या तरुणांनी चाफेकर क्लबची स्थापना केली. याच काळात महाराष्ट्रात प्रचंड दुष्काळ पडला होता. पाठोपाठ प्लेगची भंयकर साथ आली. प्रथम मुंबईत या रोगाची लागण झाली आणि तेथून ती अन्य शहरात पसरली.

प्लेगच्या साथीला आळा घालण्यासाठी ४ फेब्रुवारी १८९७ रोजी मंजुर झालेल्या एका कायद्यानुसार प्रांतिक सरकारला विशेष अधिकार देण्यात आले. प्लेगची लागण झालेल्या रोग्यास निरोगी माणसापासून वेगळे करणे व त्यास खास इस्पितळात दाखल करणे आवयक होते पण रोगाचा नायनाट करण्याच्या बहाण्याने इंग्रज पोलीसांनी जनतेवर अत्याचार सुरु केले. पुण्यात प्लेगला आळा घालण्याची खास कामगिरी कॅप्टन रँड या कडक वर्तन असलेल्या अधिकाऱ्यावर सोपविण्यात आली. त्याच्या सैनिकांनी प्लेगचा रोगी शोधण्याचा धडाका लावला. देवघरात घुसून देव्हाऱ्यासह सर्व भांडीकुंडी फेकून देत, बिछाने-कपडे जाळून टाकत. अनेक ठिकाणी किंमती ऐवज चोरीस गेला, स्त्रियांची विटंबना झाली.

या अत्याचारामुळे क्रांतीकारक पेटून ऊठले. चाफेकर बंधुंनी रँडच्या खूनाचा कट रचला. २२ जून १८९७ रोजी दामोदर चाफेकर व त्यांच्या बंधूंनी मध्यरात्री गव्हर्नर सोबत मेजवानी आटोपून घोडागाडीतून शहरात परतणाऱ्या कॅप्टन रँड व लेप्टनंट आयर्स्टवर गोळ्या झाडल्या. आयर्स्ट ताबडतोब मृत्यु पावला तर रँड दोन दिवसांनी मरण पावला. या खूनाची चौकशी सुरु झाली. गणेश शंकर द्रवीड व रामचंद्र शंकर द्रवीड हे बंधू फितूर झाल्याने १७ डिसेंबर १८९८ रोजी बाळकृष्ण चाफेकर पकडले गेले. याचा बदला घेण्यासाठी ८ फेब्रुवारी रोजी वासुदेव चाफेकर व महादेव विनायक रानडे यांनी द्रवीड बंधूंना गोळ्या झाडून ठार केले. अखेर सर्वजण पकडले गेले. दामोदर, बाळकृष्ण, वासुदेव हे चाफेकर बंधू व महादेव रानडे या सर्वांना फाशीची शिक्षा झाली.