चलेजाव चळवळ

चलेजाव चळवळीची कारणे :

१. क्रिप्स कमिशनचे अपयश – क्रिप्स कमिशनला हिंदी प्रश्नावरती समाधानकारक तोडगा काढता आला नाही. मात्र याचे खापर क्रिप्सनी राष्ट्रसभेवरही फोडले. त्यामुळे चळवळीशिवाय स्वातंत्र्य मिळणार नाही, याची खात्री हिंदी नेत्यांना झाली.

२. साम्राज्यवाद्यांचे धोरण – हिंदी लोकांचा प्रश्न सोडविण्याची आमची तयारी आहे. परंतु राष्ट्रीय काँग्रेसच्या असहकाराच्या धोरणामुळे शक्य होत नाही. राष्ट्रसभा ही देशव्यापी सर्वांची संघटना नसल्याने सत्ता कोणाकडे सोपवावी हा प्रश्न आहे, असे विरुद्ध धोरण ब्रिटिशांनी घेतले.

३. सरकारची दडपशाही – युद्धजन्य परिस्थितीमुळे महागाईचा भडका उडाला होता अशावेळी सरकारने जनतेला मदतीचा हात पुढे न करता अतिरेकी दडपशाहीचे धोरण स्विकारले.

४. जपानचे आक्रमण – जपान हिंदूस्थानावरती हल्ला यासाठीच करेल की हिंदूस्थान इंग्रजांच्या ताब्यात आहे. अन्यथा जपानचे व हिंदूस्थानचे शत्रूत्व नाही. जपानच्या आक्रमणापूर्वीच जर इंग्रजांनी हिंदूस्थान सोडला तर जपान आक्रमण करणार नाही. यासाठी राष्ट्रीय चळवळीची गरज म. गांधींना व राष्ट्रीय नेत्यांना वाटू लागली.

याविविध कारणांमुळे चलेजाव चळवळ सुरू झाली. दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्लंड पूर्णपणे अडकले असताना राष्ट्रसभेने अशावेळी जर स्वातंत्र्याची चळवळ तीव्र केली तर सरकारला ही चळवळ दडपून टाकता येणार नाही, असे म. गांधींना वाटत होते. म्हणून १४ जुलैला वर्धा येथे राष्ट्रसभेच्या वर्किंग कमिटीने इतिहास प्रसिद्ध ‘चलेजाव’ चा ठराव पास करून स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्त्व गांधीजींच्याकडे दिले. पुढच्या महिन्यात म्हणजे ८ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबई येथील गोवालीया टँक मैदानावरती काँग्रेसचे अधिवेशन भरले. अध्यक्षस्थानी मौलाना आझाद होते. या अधिवेशनासाठी लाखो लोक आले होते. जवाहरलाल नेहरू यांनी ‘चलेजाव’ चा ऐतिहासिक ठराव मांडला. हा लढा केवळ भारतीयांसाठी, त्यांच्या स्वातंत्र्यासाठी नसून जगातील सर्व दडपलेल्या राष्ट्रांच्या मुक्तीसाठी आहे आणि हे उद्दिष्ट सफल होईपर्यंत तो थांबविला जाणार नाही आणि या लढ्यासाठी अखेरची कळकळीची विनंती पंडीत नेहरू यांनी केली. म. गांधींनी यावेळी सत्तर मिनिटे भाषण केले. यावेळी ते म्हणाले, ‘‘हा माझा जीवनातील अखेरचा संघर्ष आहे. आम्ही आता अधिक काळ ब्रिटिशांच्या गुलामगिरीत राहू शकत नाही. त्यासाठी सर्वशक्तीनिशी सरकारशी लढा द्या. मी तुम्हाला छोटा मंत्र देतो तो मंत्र म्हणजे ‘करा अथवा मरा’ (Do or Die) ८ ऑगस्ट १९४२ च्या ठरावातील महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे –

  1. ब्रिटिश राजवट चालू राहणे हिंदूस्थानला अपमानास्पद आहे व हिंदूस्थानला ती दुर्बल करीत आहे.
  2. हिंदूस्थानच्या स्वातंत्र्याचा प्रश्न म्हणजे ब्रिटन व संयुक्त राष्ट्रांची परीक्षा असून आशिया व आफ्रिकेतील जनतेत आशा व उत्साह निर्माण होईल.
  3. स्वतंत्र हिंदूस्थान आपली सारी शक्ती स्वातंत्र्याकरिता खर्च करील. तो नाझी, फॅसिस्ट व साम्राज्यवादी आक्रमणाविरूद्ध लढेल.
  4. ही कमिटी गांधीजींना नेतृत्त्व करण्याची व राष्ट्राला मार्ग दाखविण्याची विनंती करीत आहे.
  5. राष्ट्रसभेला नव्हे तर देशाला सत्ता मिळावी म्हणून राष्ट्रसभा हे आंदोलन करीत आहे.

चलेजाव चळवळीची वाटचाल :

राष्ट्रसभेच्या नेत्यांना कैद

८ ऑगस्ट १९४२ रोजी रात्री चलेजावचा ठराव पास झाला. ही चळवळ निर्धाराने चालवावी यासाठी करेंगे या मरेंगे (Do or Die) असा मंत्रही दिला. गांधीजींच्या प्रेरक आणि भाषणानंतर काहीतरी विशेष घडणार या विश्वासाने लोक सभा संपल्यानंतर घरी परतले. दुसऱ्या दिवशी कार्यकारिणीची सभा होणार होती व पुढील कार्यक्रमाची दिशा ठरणार होती. ९ तारखेला पहाट होण्यापूर्वीच सरकारने देशात सर्वत्र धरपकडीचे सत्र सुरू केले. गांधींना पुण्याच्या आगाखान पॅलेसमध्ये तर नेहरू, पटेल व आझाद यांना अहमदनगरच्या तुरुंगात स्थानबद्ध केले. काँग्रेसच्या प्रांतिक तसेच तालुका स्तरापर्यंतच्या नेत्यांना अटक केली. कारण नेतृत्त्वहीन जनता व कार्यकर्ते प्रभावी चळवळ उभारू शकणार नाहीत, असे राज्यकर्त्यांना वाटत होते.

जनतेनेच चळवळीचे नेतृत्त्व केले 

९ ऑगस्टला सकाळी ९ वाजता बिर्ला भवनाजवळ कार्यकर्त्यांनी गर्दी केली. तेंव्हा गांधी, नेहरू व इतर प्रमुख नेत्यांना अटक झाल्याची बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. संतप्त झालेल्या जनतेने उत्स्फूर्तपणे निषेध मोर्चे काढले. मिरवणुका काढल्या. चलेजावच्या घोषणांनी मुंबईचे रस्ते दणाणून गेले. दिसतील त्या शासकीय वाहनांना आगी लावण्यात आल्या. लढा कसा द्यावा याबाबत जनतेत संभ्रम होता. मात्र ‘करेंगे या मरेंगे’ हा संदेश त्यांना माहीत होता. तसेच ही चळवळ आता थांबविली जाणार नाही हा विेशास होता. त्यामुळे प्राणांचाही बळी देण्यास जनता मागे-पुढे पहात नव्हती. जनतेने रस्त्याच्या कडेची झाडे तोडून रस्त्यावरती टाकली व वाहतूकीची कोंडी केली. टेलिफोनच्या तारा तोडणे, रेल्वेच्या फिश प्लेट काढणे, रेल्वेवरती हल्ला करणे, रेल्वे स्टेशन, पोस्ट ऑफिस, तहसिलदार कचेऱ्या, सरकारी कार्यालये जाळणे, सरकारी खजिना लुटणे, प्रतिसरकार स्थापन करणे, शस्त्रागारावरती हल्ला करून शस्त्रे लुटणे इ. कामे जनतेनेच पुढाकाराने केली.

सरकारची दडपशाही कृत्ये

सरकारने जनतेने चालविलेली ही चळवळ दडपून टाकण्यात कोणीच चूक केली नाही. शांतपणे चाललेल्या सभा-मिरवणूकावरती गोळीबार करणे, विमानातून मशिनगन्स चालवून जनतेच्या कत्तली केल्या, निशस्त्र लोकांवरती अत्याचार, हे रोजचे प्रकार घडले. पोलिसांच्या गोळीबारामध्ये १०२८ लोक मारले गेले, ३२०० जखमी झाले. पण ही आकडेवारी सरकारी होती. यापेक्षा कितीतरी पटीने लोक मारले गेले होते व जखमीही झाले होते. जवळजवळ ६०,००० लोकांना कारावास झाला होता. ६० ठिकाणी लष्कर बोलाविले, ३१८ ठिकाणी रेल्वे स्टेशन जाळली. १२ हजार ठिकाणी टेलिफोन तारा तोडल्या. शेकडो पोस्ट ऑफिसवरती हल्ले केले, ५९ रेल्वे गाड्या उलथून टाकल्या. ४४ लाख रुपयांची संपत्ती नष्ट करून टाकली.

म. गांधींचे उपोषण

१९४३ च्या सुरुवातीला सरकारने ‘दंगलीतील राष्ट्रसभेची जबाबदारी’ या नावाची पुस्तिका प्रसिद्ध केली व यामध्ये आंदोलनातील हिंसक घटनास म. गांधी व काँग्रेसच्या नेत्यांना जबाबदार धरण्यात आले. केवळ ओठावर अहिंसावाद कृतीत मात्र हिंसावाद असा आरोप गांधींच्या वरती करण्यात आला. पण कैदेत असताना बाहरे घडलेल्या घटनांना गांधी कसे जबाबदार हा प्रश्न गांधींना पडला. मात्र सरकारने गांधींच्यावरती अनीतिमत्ता, गुप्तता, असत्यता, जपानधार्जिने हिंसेस चिथावणी असे गंभीर आरोप केले. या विरोधात गांधींनी १० फेब्रुवारी १९४३ पासून २१ दिवसांचे उपोषण सुरू केले. गांधींची प्रकृती अत्यंत नाजूक बनली. सरकारने अत्यंविधीची तयार केली. पण तुरुंगातून मुक्तता केली नाही. ३ मार्च रोजी २१ दिवसांचे उपोषण पूर्ण केले.

चळवळीचे महत्त्व

९ ऑगस्ट १९४२ रोजी सुरू झालेली चलेजावची चळवळ हे भारतीय जनतेचे ब्रिटिशाविरुद्धचे अखेरचे आंदोलन होते. १९४३ पर्यंत बरेच भूमिगत नेते पकडले गेले. या संदर्भात जयप्रकाश नारायण म्हणतात, ‘‘फ्रान्समध्ये जसे फ्रेंच राज्यक्रांतीचे स्थान आहे, रशियात जसे रशियन राज्यक्रांतीचे स्थान आहे तसेच १९४२ च्या क्रांतीचे हिंदूस्थानच्या इतिहासात स्थान आहे. जगातील कोणत्याही क्रांतीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर जनतेने भाग घेतलेला नाही.’’ या चळवळीचे वैशिष्ट्य म्हणजे ही चळवळ जनतेने सुरू केली हेाती. चळवळ कशी करायची याबाबतची कोणतीही कल्पना नसताना जनतेनेच चळवळीचे नेतृत्त्व केले. १९४२ ची चळवळ ही स्वातंत्र्य आंदोलनातील महत्त्वाचा टप्पा ठरली. यानंतर स्वातंत्र्य अवघ्या ४-५ वर्षांत मिळाले. १९४२ च्या आंदोलनामुळे राज्यकर्त्यांचा आत्मविेशास ढळला. लाठी, बंदूका यांना जनता घाबरत नाही हे राज्यकर्त्यांच्या लक्षात आले. यामुळे भारतावरती आता आपण फार काळ राज्य करू शकणार नाही, याची खात्री राज्यकर्त्यांना झाली. आझाद हिंद सेनेलाही स्फूर्ती मिळाली. मात्र कांही मतभेदामुळे मुस्लिम लिगने इंग्रजांना सहकार्य केले. सरकारजवळ मोठा फौजफाटा, बंदूका, दारुगोळा असल्याने नि:शस्त्र जनतेला बलाढ्य सत्तेशी तोंड देणे अशक्य होते. त्यामध्ये नेत्यांना अटक झाल्याने चळवळ कशी चालवावी याबद्दलही जनतेला माहीती नव्हती. जसे जमेल तसे चळवळ चालू ठेवली. नियोजनाचा अभाव होता. तसेच भारतीय नोकरांनी इंग्रजासोबत दाखविलेली निश्ठा हाही भाग महत्त्वाचा होता. तरीही १९४२ च्या चलेजाव चळवळीमुळेच स्वातंत्र्य टप्प्यात आले, हे विसरून चालणार नाही.