चंपारण्य सत्याग्रह (१९१७)

चंपारण्य सत्याग्रह हा गांधीजींचा भारतातील पहिला सत्याग्रह होता. चंपारण्य हा बिहारमधील एक मागासलेला व शेतीप्रधान भाग होता. चंपारण्यामध्ये आंब्याची वने होती. त्याप्रमाणे निळीचीही शेती होती. युरोपियन मळेवाल्यांनी तेथील शेतकऱ्यांकडून सक्तीने निळीची लागवड केली होती.

तीन कठीया

चंपारण्यातील शेतकऱ्यांनी आपापल्या जमिनीच्या तीनविसांश भागामध्ये जमिनीच्या मूळ मालकांसाठी निळीचीच लागवड केली पाहिजे असे कायद्याचे बंधन होते. याला ‘तीन कठीया’ असे नाव होते. नीळ व्यापारी भारतीयांच्या मालाला योग्य भाव देत नव्हते.

चंपारण्य सत्याग्रह

शेवटी राजकुमार शुक्ला या स्थानिक शेतकरी नेत्याने म. गांधींच्या कानावरती हे प्रकरण घालून १९१७ मध्ये त्यांना चंपारण्यामध्ये पाचारण केले. तेथील परिस्थितीचे निरीक्षण म. गांधींनी केले. राजेंद्रप्रसाद, कृपलानी सोबत होते. मोतीहारी या चंपारण्यातील मुख्य शहरामध्ये शेतकऱ्यांची चौकशी केली, पण तेथील मॅजिस्ट्रेटने म. गांधीजीमुळे शांततेचा भंग होईल म्हणून चंपारण्य सोडून जाण्याची नोटीस दिली, पण गांधीजींनी सरकारचा आदेश मोडला. गुन्हा कबूल करून शिक्षेची तयारीही दाखविली. शेवटी ब्रिटिश सरकारनेच माघार घेत या प्रश्नांच्या चौकशीसाठी एक समिती नेमली. त्यामध्ये म. गांधींचीही नियुक्ती केली. शेवटी समितीच्या शिफारशीनुसार चंपारण्यातील शेतकऱ्यावरील अन्याय दूर करणारा कायदा पास झाला. हा लढा म. गांधीजींमुळे यशस्वी झाला.