गोपाळ हरी देशमुख

गोपाळ हरी देशमुख (१८ फेब्रुवारी १८२३ ते ९ ऑक्टोबर १८९२) हे १९ व्या शतकात होऊन गेलेले अग्रणी समाजसुधारक, मराठी पत्रकार व इतिहासलेखक होते.

जन्म व शिक्षण 

 • ”प्रभाकर” नावाच्या साप्ताहिकातून लोकहितवादी या टोपणनावाने यांनी समाजसुधारणाविषयक शतपत्रे  लिहिली. त्यांचे मूळ नाव गोपाळ हरी देशमुख. जुने आडनाव सिद्धये असे होते. यांचे घराणे मूळ रत्नागिरी जिल्ह्यातील पावसाचे होते.  
 • त्यांच्या वयाच्या २१व्या वर्षी ते न्यायालयात भाषांतरकार झाले. ’सदर अदालती’ची मुन्सिफीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर १८६२पासून ते मुंबई सरकारच्या न्यायखात्यात न्यायाधीश झाले. त्या पदावर त्यांनी अहमदाबाद, नाशिक आणि सातारा येथल्या कोर्टांत काम केले.

लेखन कार्य 

शतपत्रे

 • थोर समाजचिंतक म्हणून गोपाळरावांची कीर्ती मुख्यतः त्यांनी शतपत्रे म्हणून लिहिलेल्या निबंधांवर अधिष्ठित आहे. लोकहितवादी हे टोपण नाव घेऊन त्यांनी ही शतपत्रे लिहिली. भाऊ महाजन ह्यांच्या प्रभाकर या पत्रातून ती १८४८ ते १८५० ह्या काळात प्रसिद्ध झाली.
 • या निबंधांतून लोकहितवादींनी आपली राजकीय मते, तसेच विद्याप्रसार, आचारधर्म, परमार्थ, अनिष्ट चाली, समाजसुधारणा इ. विषयांवरील विचार स्पष्ट केले आहेत.

इतर साहित्य

 • रेव्हरंड जी.आर. ग्लीन यांच्या ‘हिस्टरी ऑफ द ब्रिटिश एम्पायर इन इंडिया‘ या पुस्तकाच्या आधारे गोपाळराव देशमुखांनी इ.स.१८४२मध्ये, म्हणजे वयाच्या एकोणिसाव्या वर्षी हिंदुस्थानचा इतिहास हे पुस्तक लिहिले.
 • १८४९ साली प्रसिद्ध झालेला त्यांचा लक्ष्मीज्ञान हा ग्रंथ मराठीतील अगदी आरंभीच्या अर्थशास्त्रीय ग्रंथांपैकी एक आहे
 • हिंदुस्थानास दारिद्र्य येण्याची कारणे ? ह्या शीर्षकाने त्यांनी इंदुप्रकाशात लिहिलेले (१८७६) आठ लेखनही महत्त्वाचे आहेत. भारताच्या दारिद्र्याची चिकित्सा लोकहितवादींनी त्यांच्या अन्य लेखनातूनही केली आहे.
 • महाराष्ट्र देशातील कामगार लोकांशी संभाषण (१८४९),
 • यंत्रज्ञान (१८५०),
 • खोटी शपथ वाहू नये आणि खोटी साक्ष देऊ नये याविषयी लोकांशी संभाषण (१८५१),
 • निगमप्रकाश (गुजराती, १८७४),
 • जातिभेद (१८७७),
 • गीतातत्त्व (१८७८).
 • सार्थ आश्वलायन गृह्यसूत्र (१८८०),
 • ग्रामरचना, त्यांतील व्यवस्था आणि त्यांची हल्लींची स्थिती (१८८३),
 • स्थानिक स्वराज्य संस्था (१८८३),
 • पंडितस्वामी श्रीमद्‌द्‌‌‌‌‌यानंद सरस्वती (१८८३),
 • ऐतिहासिक गोष्टी (२ भाग, १८८४, १८८५),
 • गुजराथचा इतिहास (१८८५)

सामाजिक कार्य

त्यांचे सामाजिक कार्यही त्यांचे लोकहितवादी पण सार्थ ठरविणारे आहे. नोकरीच्या निमित्ताने ते जेथे जेथे गेले, तेथे त्यांनी समाजोपयोगी संस्था निर्माण केल्या.

 • वाई येथे फर्स्ट क्लास मुन्सफ म्हणून काम करीत असताना त्यांनी एक वाचनालय स्थापन केले होते.
 • पुण्याच्या नेटिव्ह जनरल लायब्ररी च्या स्थापनेत त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता.
 • पुण्यात तेलुगू वाचकांसाठीही त्यांनी एक ग्रंथालय सुरू केले होते. 
 • ज्ञानप्रकाश ह्या महत्त्वाच्या वृत्तपत्राच्या स्थापनेत त्यांचा मोठा वाटा होता.
 • मुंबईहून निघणाऱ्या इंदुप्रकाश ह्या पत्राच्या स्थापनेतही ते होतेच. 
 • लोकहितवादी ह्या नावाचे एक नियतकालिक ते स्वतःही काळ चालवीत होते.
 • अहमदाबाद येथे असताना गुजराती प्रार्थना समाज, गुजराती पुनर्विवाहमंडळ इत्यादींची उभारणी करण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता. 
 • हितेच्छू हे इंग्रजी पत्र काढण्यामागेही त्यांची प्रेरणा होती, असे म्हणतात.
 • गुजराती कवी मोहनलाल दलपतराम ह्यांनी लोकहितवादींच्या गुणवर्णनपर एक काव्य लिहिले, ही बाब लोकहितवादींची गुजरातेतील लोकप्रियता स्पष्टपणे दर्शविणारी आहे.
 • प्रसिद्ध क्रांतिकारक श्यामजी कृष्णवर्मा ह्यांना विलायतेत शिक्षण घेता यावे, म्हणून त्यांनी बरेच प्रयत्न केले होते आणि पुढे श्यामजींचे नाव त्यांनी रतलाम संस्थानच्या दिवाणपदासाठी सुचवले व त्याला मान्यता मिळविली.
 • हिंदू धर्मात सुधारणा करण्याच्या भूमिकेतून स्थापन झालेल्या आर्य समाज आणि प्रार्थना समाज ह्या दोन्ही पंथांशी त्यांचा निकटचा संबंध आलेला होता. मुंबई आर्य समाजाचे प्रमुखपदही काही काळ त्यांच्याकडे होते.
 • अहमदाबाद येथे प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात त्यांचा सहभाग होता.