क्रियाविशेषण अव्यय

व्याख्या

क्रियापदांबद्दल अधिक माहिती सांगून जे शब्द अविकारी राहतात म्हणजे वाक्यातील लिंग, विभक्ती, वचन इ. च्या बदलांमुळे त्यांच्यावर काहीही परिणाम होत नाही, त्यांना क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.

क्रियाविशेषणांचे अर्थावरून पडणारे प्रकार

कालवाचक क्रियाविशेषण अव्यये

कालदर्शक

वाक्यातील क्रिया केंव्हा घडली हे दर्शविणारे शब्द.

उदा.

जेव्हा, पुर्वी, मागे, आधी, आता, सध्या, उद्या, परवा, लगेच, केव्हा, दिवसा, राञी, तूर्त, हल्ली, काल, इ.

सातत्यदर्शक

वाक्यातील क्रियेचे सातत्य दर्शविणारे शब्द.

उदा.

सर्वदा, नेहमी, दिवसभर, आजकाल, नित्य, सदा,अद्याप इ.

आवृत्तीदर्शक

वाक्यात घटनेची पुनरावृत्ती दर्शविणारे शब्द.

उदा.

दररोज, दोनदा, पुन्हा पुन्हा, क्षणोक्षणी, फिरून, वारंवार, सालोसाल, इ.

 स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यये

स्थितीदर्शक

वाक्यातील क्रियेचे स्थळ/ठिकाण दर्शविणारे शब्द.

उदा.

वर, तिकडे, खाली, कोठे, मध्ये, मागे, पुढे, येथे, तेथे, जेथे, जिकडे, अलीकडे इ.

गतिदर्शक

वाक्यातील क्रिया कोठून घडली हे दर्शविणारे शब्द.

उदा.

लांबून, दुरून, तिकडून, मागून, पुढून, वरून, इकडून, खालून,  इ.

रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यये

प्रकारदर्शक

वाक्यातील क्रिया कशी घडते किंवा तिची रीत दाखविणारे शब्द.

उदा.

मुद्दाम, हळू, सावकाश, असे, उगीच, व्यर्थ, तसे, जसे, कसे, आपोआप,  जलद, फुकट, इ.

अनुकरणदर्शक

वाक्यातील क्रिया कशी घडली, हे दाखविणारे अनुकरणवाचक शब्द.

उदा.

पटापट, टपटप, पटकन, चमचम, बदाबदा, झटकन इ.

निश्चयदर्शक

वाक्यातील क्रियेत निश्चय दर्शविणारे शब्द.

उदा.

खुशाल, निखालस, खचित, खरोखर, नक्की  इ.

संख्यावाचक/परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यये

वाक्यातील शब्द जेंव्हा क्रियेची संख्या किंवा परिणाम दाखवितो, तेंव्हा त्याला संख्यावाचक/परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.

उदा.

थोडा, क्वचित, बिलकुल, मुळीच अत्यंत, कमी, मोजके, पूर्ण, जास्त, किंचित, जरा, काहीसा, अगदी, भरपूर, अतिशय इ.

प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यये

वाक्यातील का/ना हे शब्द जेंव्हा क्रियापदाला प्रश्नार्थक बनवितात, तेंव्हा त्यांना प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.

उदा.

तू परगावी जातोस का?

तू आईसक्रीम खाणार का?

तुम्ही बागेत फिरायला याल ना?

तुम्ही वाचन कराल ना?

निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यये

वाक्यातील न/ना हे शब्द जेंव्हा क्रियेचा निषेध किंवा नकार दर्शवितात तेंव्हा त्याला निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.

उदा.

मी न विसरता तुझे काम करेन.

तो न चुकता आला.

त्याने खरे सांगितले तर ना.

मी न चुकता तुला फोन करेन.

क्रियाविशेषणांचे स्वरुपावरून पडणारे प्रकार

सिद्ध क्रियाविशेषण अव्यय

काही शब्द मुळातच क्रियाविशेषण अव्यय असतात, सिद्ध क्रियाविशेषण अव्यये असे म्हणतात.

उदा.

मागे, पुढे, येथे, तेथे, आज इ.

साधित क्रियाविशेषण अव्यय

नाम, विशेषण, क्रियापद, शब्दयोगी अव्यय यांच्यापासून तयार झालेल्या क्रियाविशेषण अव्ययांना साधित क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.

  1. नामसाधित-सकाळी, राञी, व्यक्तीशः, दिवसा, वस्तुतः
  2. सर्वनामसाधित-यावरून, त्यावरून, कित्येकदा
  3. विशेषणसाधित-इतक्यात, एकदा, एकञ, मोठ्याने
  4. धातूसाधित- पळताना, हसू, हसताना, खेळताना, हसत
  5. अव्ययसाधित- खालून, कोठून, खालून, इकडून,
  6. प्रत्ययसाधित- मनःपुर्वक, शास्ञदृष्ट्या, कालानुसार

सामासिक क्रियाविशेषण अव्यय

काही जोडशब्द किंवा सामासिक शब्द क्रियाविशेषण अव्ययाचे काम करतात, अशा दोन शब्दांना सामासिक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात.

उदा.

राञंदिवस, गावोगाव, आजन्म, हरघडी, गैरहजर, गैरकायदा, , समोरासमोर, घरोघर, यथाशक्ती, दररोज, प्रतिदिन, इ.

मित्रांसोबत शेयर करा.

Leave a comment

Your email address will not be published.

error: