क्रियापद

वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद होय.

 • गाय दूध देते.
 • मुलांनी खरे बोलावे.
 • आमच्या संघाने ढाल जिंकली.

वरील वाक्यांमध्ये देते, बोलावे, जिंकली या शब्दांना क्रियापद म्हणतात.

 • ताई रोज टेकडीवरच्या मंदीरात जाऊन येते.

या वाक्यात जाऊन व येते हे क्रिया दाखविणारे दोन शब्द आहेत. हे शब्द जाण्याची व येण्याची क्रिया दाखवितात. पण जाऊन या शब्दाने त्या क्रियेचा अर्थ पूर्ण होत नाही. येते या क्रियावाचक शब्दाने तो अर्थ पूर्ण होतो. म्हणून जाऊन हे क्रियापद नसून वाक्यात येते हे क्रियापद आहे.

धातू – वरील वाक्यात येते या क्रियापदात मूळ शब्द ये हा असून त्याला ते हा प्रत्यय लागलेला आहे आणि त्यापासून येते हे क्रियापदाचे रूप बनलेले आहे. क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला धातू असे म्हणतात.

धातूसाधिते किंवा कृदन्ते – धातूला विविध प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखविणाऱ्या शब्दांना धातुसाधिते किंवा कृदन्ते असे म्हणतात.

 • धातुसाधिते नाम, विशेषणे किंवा क्रियाविशेषणाचे काम करतात.
 • धातुसाधिते वाक्याच्या शेवटी कधीच येत नाहीत. ते वाक्याच्या सुरूवातीला किंवा वाक्याच्या मध्ये येतात.
 • फक्त संयुक्त क्रियापदातच धातुसाधिते क्रियापदाचे काम करतात.

अशा प्रकारे वाक्यातील क्रिया दाखविण्याबरोबरच वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द ही क्रियापदाची व्याख्या महत्वाची आहे. वाक्यात क्रिया दाखविणारे आणखी काही शब्द असू शकतात, पण ते वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाहीत.

धातूला प्रत्यय लागून क्रियापदाची विविध रूपे बनतात. उदा. बस -ः बसतो-बसला-बसतात. धातूंपासून बनलेली ही रूपे वाक्याचा अर्थ पूर्ण करतात. माञ गा- गाणे, गाऊन, गाताना ही देखील धातूंपासून तयार झालेली रूपे आहेत, ती वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाहीत. उदा.

 1. त्याने सर्वांना गाऊन मंञमुग्ध केले.
 2. तो आता गात नाही.
 3. नाव समुद्रात बुडताना मी पाहिली.
 4. मूर्ख माणसांच्या हसण्याकडे आपण लक्ष देऊ नये.
 5. दारू पिणारी माणसे रोगाला बळी पडतात.

या वाक्यांमध्ये गाऊन, गात, बुडताना, हसणारी, पिणारी या क्रियावाचक शब्दांनी वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. त्यामुळे गाऊन, गात, बुडताना, हसणारी, पिणारी ही केवळ धातूसाधिते आहेत.

क्रियापद

कर्ता व कर्म

 • कर्ता म्हणजे क्रिया करणारा. वाक्यात क्रियापदाने दाखवलेली क्रिया करणारा जो कोणी असतो, त्यास कर्ता म्हणतात.
 • क्रियापदाने दाखविलेली क्रिया ज्याच्यावर करतो ते त्याचे कर्म. वाक्यातील क्रियापदाने दाखविलेली क्रिया कर्त्यापासून निघते व ती दुसऱ्या कोणावर किंवा कशावर तरी घडते. त्या क्रियेचा परिणाम ज्याच्यावर घडतो किंवा ज्याच्याकडे त्या क्रियेचा रोख किंवा कल असतो, ते त्याचे कर्म.

वाक्यातील कर्ता व कर्म कसे शोधतात ?

कर्ता शोधताना प्रथम वाक्यातील क्रियापदाचा मूळ धातू शोधून काढावा व त्याला “-णारा” हा प्रत्यय लावून कोण असा प्रश्न करावा, म्हणजे कर्ता मिळतो. उदा. १) श्याम लाडू खातो.

या वाक्यातील खातो या क्रियापदातील खा या धातूला णारा हा प्रत्यय लावून खाणारा कोण असा प्रश्न विचारला की श्याम हे उत्तर मिळते. म्हणून श्याम हा कर्ता. वाक्यातील कर्म शोधताना मुख्य क्रियापदाने दाखविलेली क्रिया कोणावर घडते असा प्रश्न करावा, ती क्रिया ज्या वस्तूवर किंवा प्राण्यावर घडते ते त्याचे कर्म. वरील उदाहरणात खाण्याची क्रिया कोणावर घडते-लाडूवर, म्हणून लाडू हे वाक्यातील कर्म.

 • मी मांजराला मारतो.

या वाक्यात मारणार कोण-  मी, म्हणून मी हा या वाक्यातील कर्ता. मारण्याची क्रिया कोणावर घडते- मांजरावर, म्हणून मांजर हे कर्म.

 • विद्यार्थी हुशार आहे.

या वाक्यात असणारा कोण- विद्यार्थी. म्हणून विद्यार्थी हा या वाक्यातील कर्ता. प्रामाणिक असण्याची क्रिया कोणावर घडते- विद्यार्थ्यावरच. म्हणजे येथे क्रिया कर्त्यापासून पुढे जात नाही, म्हणून या वाक्यात कर्म नाही. आहे हे अकर्मक क्रियापद आहे.

 • मला केळी आवडते.

या वाक्यात आवडते हे क्रियापद आहे. आवड हा मूळ धातू आहे. आवडणारे काय? केळी. म्हणून या वाक्यात केळी हा कर्ता आहे.

 • त्याला थंडी वाजते- थंडी हा कर्ता
 • राजाला मुकुट शोभतो- मुकुट हा कर्ता
 • मला चंद्र दिसतो- चंद्र हा कर्ता

क्रिया करणारा तो कर्ता व ती क्रिया भोगणारे किंवा सोसणारे ते कर्म असते.

क्रियापदांचे प्रकार

१) सकर्मक क्रियापद

ज्या क्रियापदाला अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची जरूरी असते, त्यास सकर्मक क्रियापदे असे म्हणतात. कर्मासह असलेले क्रियापद हे सकर्मक क्रियापद होय.उदा.

 • राजाने प्रधान बोलावला.
 • गवळी धार काढतो.
 • अनुराग निबंध लिहितो.
 • मुकुंद लाडू खातो.

वरील वाक्यांना पुर्ण अर्थ आहे. माञ या वाक्यांतील अनुक्रमे प्रधान ,धार, निबंध व लाडू या कर्मांमुळेच या वाक्यांना अर्थ प्राप्त झाला आहे. म्हणजे बोलावला, काढतो, लिहितो व खातो या क्रियापदांना त्या वाक्यातील कर्माची जरूरी आहे. अन्यथा वाक्यांना अर्थ प्राप्त होऊ शकला नसता. म्हणून बोलावला, काढतो, लिहितो व खातो ही सकर्मक क्रियापदे आहेत.

२) अकर्मक क्रियापद

कर्त्यापासून सुरू झालेली क्रिया कर्त्यापाशीच थांबत असेल किंवा कर्त्यापाशीच लोप पावत असेल तर ते क्रियापद अकर्मक क्रियापद असते. उदा.

 • तो बागेत पडला.
 • कानात वारे शिरले.
 • आज भाऊबीज आहे.
 • नदी खळखळ वाहते.
 • ती मोठ्याने हसली.

वरील वाक्यातील तो बागेत पडला या वाक्यात पडण्याची क्रिया कर्त्यावरच घडते. ती क्रिया कर्त्याहून पुढे जात नाही. तो बागेत पडला या वाक्यातच पूर्ण अर्थ आहे. पडला या क्रियापदाला कर्माची जरूरी नाही, म्हणून पडला हे अकर्मक क्रियापद आहे. तसेच आहे, शिरले, वाहते, हसली या क्रियापदांना कर्माची गरज नाही. वाक्यात कर्म नसले तरी वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यास क्रियापद सक्षम असते.

काही अकर्मक धातू

अस, नस, हो, उठ, बस, नीज, झोप, रड, पड, सड, मर, धाव, थांब, शक, जाग, झिज, वाढ, झड, जळ, उजळ, आेरड, घोर, सळसळ, राह, वाह, उमल, जन्म, पीक, वाज, भीज, रूज, शीज इ.

३) द्विकर्मक क्रियापद

काही वाक्यांमध्ये क्रियापदांना अर्थ पूर्ण करण्यासाठी दोन कर्मे लागतात, अशा क्रियापदांना द्विकर्मक क्रियापदे असे म्हणतात. उदा.

 • मुलांनी चावक्या कुञ्याला खडे मारले.
 • गुरूजींनी विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवले.
 • आजीने नातवाला गोष्ट सांगितली.
 • मुलीने राजाला पिशवी दिली.
 • तिने भिकार्याला पैसा दिला.

वरील वाक्यांत मारले, शिकवले, सांगितली, दिला ही क्रियापदे सकर्मक असून त्यांना दोन कर्मे आहेत. दुसऱ्या वाक्यात शिकवणारे कोण- गुरूजी. गुरूजी हा कर्ता. शिकवण्याची क्रिया कोणावर घडते- इंग्रजी व विद्यार्थी या दोघांवर. यातील वस्तूवाचक कर्मांना प्रत्यक्ष कर्म असे म्हणतात व व्यक्तीवाचक कर्मांना अप्रत्यक्ष कर्म असे म्हणतात.

वरील वाक्यांत इंग्रजी, गोष्ट, पैसा ही प्रत्यक्ष कर्मे आहेत, तर विद्यार्थ्यांना, नातवाला, भिकाऱ्या ला ही अप्रत्यक्ष कर्मे आहेत. प्रत्यक्ष कर्मांची विभक्ती द्वितीया असते तर अप्रत्यक्ष कर्मांची विभक्ती संप्रदानी चतुर्थी असते.

४) उभयविध क्रियापद

जे एकच क्रियापद दोन वेगवेगळ्या वाक्यांत सकर्मक व अकर्मक असे दोन्ही प्रकारे वापरता येते त्यास उभयविध क्रियापदे असे म्हणतात. उदा. कापले, आठवले, स्मरले, लोटले, मोडले, उघडले इ.

 • त्याने बोट कापले.(सकर्मक)
 • त्याचे बोट कापले.(अकर्मक)
 • त्याने घराचे दार उघडले. (सकर्मक)
 • त्याच्या घराचे दार उघडले. (अकर्मक)
 • रामाने धनुष्य मोडले. (सकर्मक)
 • ते लाकडी धनुष्य मोडले. (अकर्मक)

५) विधानपूरक क्रियापद

सकर्मक क्रियापदाला कर्माची आवश्यकता असते. कर्म असल्याशिवाय सकर्मक धातूसंबंधीचे विधान पूर्ण होत नाही. अकर्मक क्रियापदांना कर्मांची आवश्यकता नसते. केवळ कर्ता व  क्रियापद एवढ्यानेच सकर्मक धातूच्या बाबतीत विधान पूर्ण होते. परंतु काही अकर्मक धातू असे आहेत की कर्ता व क्रियापद असूनही त्यांचा अर्थ अपूर्ण असतो. उदा.

 • बाळ झाला.
 • निशा आहे.
 • पेरू निघाला.

वरील उदाहरणांमध्ये झाला, आहे, निघाला ही क्रियापदे अपुऱ्या विधानांची आहेत. अशा प्रकारच्या क्रियापदांना अपूर्ण विधान क्रियापदे म्हणतात. ती विधाने पूर्ण करण्यासाठी काही शब्दांची आवश्यकता असते. जसे,

 • बाळ मोठा झाला.
 • निशा सुंदर आहे.
 • पेरू किडका निघाला.

या वाक्यांमध्ये बाळ, सुंदर, किडका हे शब्द अपूर्ण विधाने पुर्ण करतात. अशा शब्दांना विधानपूरक किंवा पूरक असेही म्हणतात.

६) संयुक्त व सहाय क्रियापद

 • वर्गात विद्यार्थी वाचू लागले
 • आपणही आता वाचू.

पहिल्या वाक्यातील वाचू हा शब्द वाचण्याची क्रिया दाखवितो, पण तो वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही. दुसऱ्या वाक्यातील वाचू या क्रियावाचक शब्दाने माञ वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. म्हणून दुसऱ्या वाक्यातील वाचू हे क्रियापद होय. पहिल्या वाक्यातील वाचू लागली या दोन शब्दांनी क्रिया पूर्ण होते. केवळ लागली या शब्दाने क्रियेचा अर्थ पूर्ण होत नाही. वाचू लागली या संयुक्त शब्दांत वाचू हे धातूसाधित असून लागली या क्रियावाचक शब्दाने वाचण्याची क्रिया पूर्ण करण्यास सहाय्य केले म्हणून लागली हे सहाय क्रियापद होय. वाचू लागली हे क्रियापद धातूसाधित व सहाय क्रियापद यांच्या संयोगाने बनले आहे. म्हणून अशा क्रियापदाला संयुक्त क्रियापदे असे म्हणतात.

धातूसाधित व सहाय क्रियापद यांनी मिळून संयुक्त क्रियापद बनते. पण त्याला एक अट असते. ती म्हणजे या संयुक्त क्रियापदाने दर्शविलेली क्रिया एकच असायला हवी. त्या वेगवेगळ्या क्रिया असून चालत चालत नाही. उदा.

 • सीता, एवढा खाऊ खाऊन टाक.
 • सीता, एवढा खाऊ खाऊन जा.

पहिल्या वाक्यात खाऊन टाक हे संयुक्त क्रियापद आहे. येथे खाण्याची व टाकण्याची अशा दोन क्रिया नसून खाऊन टाक याचा अर्थ खा. दुसऱ्या वाक्यात खाऊन जा या शब्दांत खाण्याची व नंतर जाण्याची अशा दोन वेगवेगळ्या क्रिया आहेत. म्हणून खाऊन जा हे संयुक्त क्रियापद नाही. जा हे मुख्य क्रियापद असून खाऊन हे धातूसाधित आहे.