केन्द्रीय निवडणुक आयोग

राज्यघटनेच्या कलम ३२४ नुसार केंद्रीय निवडणुक आयोग स्थापन केलेला आहे. केंद्रीय निवडणुक आयोगाकडून संसद, राज्य विधीमंडळ, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यासाठी निवडणूक घेतली जाते.

सदस्य संख्या-

कलम ३२४ नुसार निवडणुक आयोगामध्ये एक मुख्य निवडणुक आयुक्त व राष्ट्रपती वेळोवेळी ठरवतील इतके इतर निवडणुक आयुक्त असतील अशी तरतुद आहे. १५ ऑक्टोबर १९८९ पर्यंत निवडणुक आयोग एक सदस्यीय होता. ६१ व्या घटनादुरुस्तीने मतदाराचे वय २१ वरुन १८ केल्याने वाढलेल्या कामाचा निपटारा करण्यासाठी १६ ऑक्टोबर १९८९ रोजी राष्ट्रपतींनी आणखी दोन निवडणुक आयुक्त नियुक्त केले. जानेवारी १९९० आयोगातील दोन निवडणुक आयुक्तांचे पद नष्ट केले. त्यानंतर ऑक्टोबर १९९३ मधे राष्ट्रपतींनी आणखी दोन निवडणुक आयुक्त नियुक्त केले. तेंव्हापासुन निवडणुक आयोग ञिसदस्सीय आहे.

कार्यकाल

निवडणुक आयुक्त ६ वर्षे किंवा वयाची ६५ वर्षे यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत आपल्या पदावर राहतात. माञ त्यापूर्वी ते आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात किंवा त्यांना पदावरुन बरखास्त केले जाउ शकते. मुख्य निवडणुक आयुक्तांना त्यांच्या कार्यकालाची शाश्वती दिलेली आहे. ज्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला पदच्यूत केले जाते त्याच पद्धतीने मुख्य निवडणुक आयुक्तांना पदच्यूत करता येते. म्हणजे गैरवर्तणूक व अकार्यक्षमता या दोन कारणांमुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांनी विशेष बहुमताने ठराव पारित केला तर राष्ट्रपती त्यांना पदच्युत करतात.

केंद्रीय निवडणुक आयोग-कार्ये

 1. विविध मतदार संघाच्या याद्या तयार करणे.
 2. राष्ट्रपती,उपराष्ट्रपती, संसदेची दोन्ही सभागृहे आणि घटकराज्यांच्या विधिमंडळाची सभागृहे यांच्या प्रतिनिधींच्या निवडणुका घेणे.
 3. राष्ट्रीय व प्रादेशिक पक्ष म्हणून राजकीय पक्षांना मान्यता देणे व त्यांच्यात निवडणूक चिन्हांचे वाटप करणे.
 4. राजकीय पक्षांकरिता आचार संहिता तयार करणे.
 5. निवडणुकांचे वेळापत्रक ठरवून ते प्रसिद्ध करणे.
 6. उमेदवारांकडून ठराविक नमुन्यात अर्ज मागविणे, त्यांची छाननी करणे, वैध उमेदवारांची यादी करणे.
 7. निवडणुकांचे आयोजन करणे आणि निवडणूक संचालनातून निर्माण होणारे वाद सोडविणे. मतदानात गैरप्रकार आढळल्यास संपूर्ण किंवा विशिष्ट मतदान केंद्रात फेरमतदान आयोजित करणे.
 8. मतदान झाल्यानंतर मतमोजणीची व्यवस्था करणे, निवडणुकीचे निकाल जाहीर करणे.
 9. देशातील सर्व मतदारांना ओळखपत्र वितरीत करणे.
 10. एखाद्या व्यक्तिस मतदानास अपात्र ठरविणे.
 11. मतदारांच्या सुरक्षिततेची हमी देणे.
 12. निवडणूक नि:पक्षपातीपणे,शांततामय व मोकळया वातावरणात होतील याची खबरदारी घेणे.