कर्मवीर भाऊराव पाटील

जन्म व शिक्षण 
 • कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज येथे २२ सप्टेंबर १८८७ रोजी झाला. सांगली जिल्ह्यातील ऐतवडे बुद्रुक हे त्यांचे मूळ गाव होय.
 • त्यांचे प्राथमिक शिक्षण सांगली जिल्ह्यातील विटा आणि इतर काही गावांत झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची राहण्याची सोय जैन बोर्डिंगमध्ये करण्यात आली होती. याच काळात त्यांच्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव पडला.
कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कार्य
 • कर्मवीर भाऊराव पाटील यांनी समाजात शिक्षणप्रसार करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वाहून दिले. यामागे महात्मा फुले व राजर्षी शाहू महाराजांची प्रेरणा होती.
 • कर्मवीरांनी दुधगाव येथे ‘दुधगाव विद्या प्रसारक मंडळ’ या संस्थेची स्थापना करुन वस्तीगृह सुरु केले.
 • ४ ऑक्टोबर १९१९ रोजी त्यांनी सातारा जिल्ह्यातील काले येथे ‘रयत शिक्षण संस्थेची’ स्थापना केली. कालांतराने या संस्थेचे मुख्यालय  सातारा येथे नेण्यात आले. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात अनेक प्राथमिक, माध्यमिक शाळा व महाविद्यालये सुरु केली व वसतीगृहे बांधली. या शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कर्मवीरांनी ‘कमवा व शिका’ हा संदेश दिल्यामुळे अनेक विद्यार्थी गरीबीच्या परिस्थितीतही शिकले.
 • १९२४ मध्ये या संस्थेच्या वतीने सातारा येथे ‘छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस’ सुरु केले तसेच १९३५ मध्ये प्राथमिक शाळेतील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी ‘ट्रेनिंग कॉलेज’ सुरु केले.
 • १९४७ मध्ये संस्थेने सातारा येथे ‘छत्रपती शिवाजी कॉलेज’ सुरु केले.
 • अशाप्रकारे १९५० पर्यंत संस्थेने ५७८ प्राथमिक शाळा, १०१ माध्यमिक शाळा व अनेक महाविद्यालये व वसतीगृहे संपूर्ण महाराष्ट्रात सुरु करुन कर्मवीर भाऊराव पाटीलांनी शिक्षणाचा प्रसार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्याचे उल्लेखनीय कार्य केले व महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्राचा विकास केला.
 • ९ मे १९५९ रोजी कर्मवीर भाऊराव पाटील यांचे निधन झाले.
पुरस्कार व सन्मान
 • जनतेने भाऊराव पाटलांचा कर्मवीर ही पदवी देऊन गौरव केला.
 • केंद्रशासनाने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले.
 • पुणे विद्यापीठाने त्यांचा इसवी सन १९५९ मध्ये सन्माननीय डी. लिट. ही पदवी दिली.
 • श्री. ह. रा. महाजनी यांनी ‘महाराष्ट्राचे बुकर टी. वॉशिंग्टन’ या यथार्थ शब्दांत कर्मवीरांचे वर्णन केले आहे.