उभयान्वयी अव्यय

दोन किंवा अधिक शब्द अथवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. प्रधानत्वसूचक व गौणत्वसूचक असे उभयान्वयी अव्ययाचे मुख्य दोन प्रकार केले जातात.

उभयान्वयी अव्यय

उभयान्वयी अव्ययाचे प्रकार

अ) प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यये –

दोन स्वतंञ आणि अर्थपूर्ण वाक्ये जोडणाऱ्या शब्दाला प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. या प्रकारातून बनलेली वाक्ये संयुक्त असतात. याचे चार उपप्रकार आहेत.

समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यये 

समुच्चय म्हणजे बेरीज/मिळवणे. जी उभयान्वयी अव्यये पहिल्या विधानात अधिक भर टाकण्याचे कार्य करतात, त्यांना समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात. व, आणि, अन्, आणखी, शिवाय, आणिक, नि ही समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यये आहेत. उदा.

 1. सकाळ झाली व मुले शाळेकडे निघाली.
 2. तो भेटला आणि चटकन निघून गेला.
 3. त्याने काम केले नाही; शिवाय शिरजोरपणा करू लागला.
 4. कानामागून आली अन् तिखट झाली.
 5. सीमाने आज डब्यात श्रीखंड अन् पुरी आणली आहे.

विकल्पबोधक उभयान्वयी अव्यये 

जी उभयान्वयी अव्यये पर्याय दर्शवितात, म्हणजेच दिलेल्या गोष्टींपैकी एकाची निवड करणे ही अपेक्षा असते, त्यांना  विकल्पबोधक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात. किंवा, अथवा, की, अगर, वा ही विकल्पबोधक उभयान्वयी अव्यये आहेत. उदा.

 1. मी किंवा माझी मुलगी या कागदावर सही करेल.
 2. मदत मिळो अथवा न मिळो, मी जाणारच.
 3. विचार कर वा ना कर, घडायचे ते घडणारच.
 4. देह जावो अथवा राहो । पांडूरंगी दृढ भावो।
 5. तुला ज्ञान हवे की धन हवे.

न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यये 

न्यूनत्व म्हणजे कमीपणा. पहिल्या वाक्यातील कमतरता, उणीव दाखविणारे दुसरे वाक्य ज्या शब्दाने दाखविले जाते त्याला न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात. पर, परंतू, बाकी, किंतू, परी ही न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्ययांची उदाहरणे आहेत. उदा.

 1. आईला थोडा टॅप होता ; बाकी सर्व ठीक.
 2. भाऊला थोडेफार लागले आहे; बाकी सर्व खुशाल.
 3. सर्व मुले उत्तीर्ण झाली; परंतू गुणवत्ता यादीत कोणीच आले नाही.
 4. मरावे; परी किर्तीरूपे उरावे.
 5. शेतकर्यांनी शेत नांगरले; पण पाऊस पडलाच नाही.

परिणामबोधक उभयान्वयी अव्यये 

पहिल्या वाक्यातील घटनेमुळे किंवा कृत्यामुळे दुसऱ्या वाक्यात जो बदल घडतो किंवा दुसऱ्या वाक्यावर जो परिणाम होतो. ते दर्शविणाऱ्या अव्ययाला, परिणामबोधक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात. म्हणून, याकरिता, सबब, यास्तव, की, तस्मात ही परिणामबोधक उभयान्वयी अव्ययांची उदाहरणे आहेत. उदा.

 1. माईंनी खूप ञास काढला, म्हणून तर आता सुखात जगताहेत.
 2. शरीर घाटदार व्हावे, म्हणून आम्ही व्यायाम करतो.
 3. गाडी वाटेत बंद पडली; सबब मी उशीरा पोहोचलो.

ब) गाैणत्वसूचक उभयान्वयी अव्यय –

जी उभयान्वयी अव्यये एक प्रधान वाक्य व दुसरे गाैण वाक्य यांना एकञीत जोडण्याचे कार्य करतात, त्यांना गाैणत्वसूचक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात. या प्रकारापासून बनलेली वाक्ये मिश्र स्वरूपाची असतात. याचे पुढील चार उपप्रकार आहेत.

स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यये 

जी उभयान्वयी अव्यये दोन वाक्यांचा संबंध जोडतात आणि प्रधान वाक्याचे स्वरूप गाैण वाक्यात उलगडून सांगतात अशा उभयान्वयी अव्ययांना स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात. म्हणजे, की, म्हणून जे ही स्वरूपबोधक उभयान्वयी अव्ययांची उदाहरणे आहेत. उदा.

 1. सम्राट अशोक म्हणून एक राजा होऊन गेला.
 2. एक किलोग्रॅम म्हणजे एक हजार ग्रॅम.
 3. आई म्हणाली की, आज पाहुणे येणार आहेत.

कारणबोधक उभयान्वयी अव्यये  

जी उभयान्वयी अव्यये प्रधानवाक्यामध्ये घडलेली घटना व घटनेचे कारण दर्शविणाऱ्या गाैण वाक्याला जोडते त्यांना कारणबोधक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात. कारण, का-की ही कारणबोधक उभयान्वयी अव्ययांची उदाहरणे आहेत. उदा.

 1. त्याला बक्षीस मिळाले कारण त्याने प्रथम क्रमांक पटकावला.
 2. मला हे जेवण आवडते का की ते आईने बनविले आहे.

उद्देशबोधक उभयान्वयी अव्यये

गाैण वाक्य हे प्रधान वाक्याचा उद्देश/हेतू आहे असे ज्या अव्ययांनी दर्शविले जाते त्यांना उद्देशबोधक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात. म्हणून, सबब, यास्तव, कारण ही उद्देशबोधक उभयान्वयी अव्ययांची उदाहरणे आहेत. उदा.

 1. चांगले शिक्षण मिळावे, म्हणून तो पुण्यास गेला.
 2. प्रथम क्रमांक यावा यास्तव त्याने खूप अभ्यास केला.

संकेतबोधक उभयान्वयी अव्यये 

प्रधान वाक्य व गाैण वाक्य यांतील परस्परावलंबन दाखविणाऱ्या अव्ययांना संकेतबोधक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात. जर-तर, जरी-तरी ही संकेतबोधक उभयान्वयी अव्ययांची उदाहरणे आहेत. उदा.

 1. जर बाबा लवकर घरी आले तर आपण बाहेर जेवायला जाऊ.

महत्वाचे –

जोडीने येणारी सर्वनामे (जो-तो, जे-ते, ज्याचे-त्याचे, ज्याला-त्याला) व क्रियाविशेषणे (जेथे-तेथे, जेंव्हा-तेंव्हा, जसे-तसे, जिकडे-तिकडे, जरी-तरी,जर-तर) यांचासुद्धा उभयान्वयी अव्ययाप्रमाणे वापर होतो. उदा

 1. जसे करतो, तसे भरतो.
 2. जो आवडतो सर्वांना, तोची आवडे देवाला.
 3. जिकडे बघावे तिकडे हिरवेगार गवत होते.
 4. जर राम घरी लवकर आला तर मी त्याला तुझ्याकडे पाठवते.

सूचना: संपूर्ण मराठी व्याकरण अभ्यासण्यासाठी कृपया खालील बटनावर क्लिक करा.