आर्य समाज

स्वामी दयानंद सरस्वती यांनी १० एप्रिल, १८७५ रोजी मुंबई येथे आर्य समाज स्थापन केला. दयानंदनी २४ जून, १८७७ रोजी पंजाब प्रांतातील लाहोर येथे आर्य समाजाची शाखा सुरू केली. पुढे लाहोर हेच या समाजाचे मुख्य केंद्र बनले.

आर्य समाजाची तत्त्वे

आर्य समाजाच्या तत्त्वज्ञानात वेद प्रामाण्यावर भर दिला. आर्य समाजाचे तत्त्वज्ञान पुढीलप्रमाणे :

 • वेद हा आर्याचा पवित्र धर्मग्रंथ असून तो सर्व आर्यांनी प्रामाण्य मानावा.
 • ईश्वर हा एकच असून तो निराकार, अनंत, न्यायी, सर्वसाक्षी, दयाळू, सर्वशक्तीमान आणि पवित्र आहे. ईश्वर हा सृष्टीचा निर्माता व नियंता आहे.
 • परमेेशराच्या शुद्ध स्वरुपाचे ज्ञान वेदात असून प्रत्येक हिंदू व्यक्तीने वेदाचा अभ्यास करणे हे त्यांचे प्रथम कर्तव्य आहे.
 • आर्याच्या वैदिक धर्माचे दरवाजे सर्व धर्मियांसाठी खुले आहेत. शुद्धीकरणाने कोणासही या धर्मात प्रवेश मिळतो.
 • प्रत्येक आर्य समाजाच्या अनुयायाने सत्य ग्रहण करावे व असत्याचा त्याग करावा.
 • प्रत्येकाने एकमेकांबरोबर प्रेमाने व न्यायाने वागावे.
 • आर्य धर्माचा मूळ उद्देश्य मानव जातीचे कल्याण करणे हाच आहे.
 • केवळ स्वत:च्या कल्याणाचा विचार न करता इतरांच्या कल्याणासाठी सदैव प्रयत्न करावा.
 • समाजाच्या कल्याणांच्या आड वैयक्तिक मतभेद आणू नयेत.
 • अज्ञानाचा नाश करुन ज्ञानाच्या प्रसाराचे ध्येय प्रत्येकाने बाळगावे.
आर्य समाजाची कामगिरी
धार्मिक सुधारणा

आर्य समाजाने वेदाचे प्रामाण्य मान्य केले. वेदात सांगितलेल्या ‘‘विशुद्ध धर्माचे अनुकरण” करण्याचा आग्रह धरला. रुढी-परंपरेने उपासनेच्या मगरमिठ्ठीत सापडलेल्या हिंदू धर्माला वाचविण्यासाठी दयानंदानी ’Go back to Vedas’ (वेदाकडे परत चला) हा आदेश दिला.

शुद्धीकरण चळवळ

आर्य समाजाचे आणखी एक महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी हाती घेतलेली शुद्धीकरणाची मोहिम होय. ख्रिश्चन आणि मुस्लीम धर्मात सक्तीने धर्मांतरीत झालेल्या हिंदूना पुन्हा स्वधर्मात घेण्यात आले. इ. स. १८२१ मध्ये मलबार येथील अनेकांना सक्तीने मुसलमान धर्माची दिक्षा दिली. अशा सुमारे २५०० लोकांना आर्य समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेतले. तसेच शुद्धीकरणाची ही मोहिम राजस्थान, हैद्राबाद आणि पंजाबमध्ये सुद्धा राबवली.

शैक्षणिक कार्य

स्वामी श्रद्धानंदांनी ‘गुरुकूल विद्यालये’ स्थापन केली. या शाळातून संस्कृत आणि वैदिक शिक्षण दिले जाऊ लागले. लाला हंन्सराज यांनी लाहोर येथे ‘दयानंद ॲग्लो-वेदिक कॉलेज’ सुरू करुन इंग्रजी आणि वैदिक शिक्षणाचा प्रसार केला. आजही महाराष्ट्रात कोल्हापूर, सोलापूर आणि मुंबई येथे आर्य समाजाच्या संस्थामधून शैक्षणिक कार्य सुरू आहे.

राष्ट्रभक्तीच्या प्रसाराचे कार्य

स्वामी दयानंदानी ‘आर्यावत ही आर्याची भूमी आहे’ हे घोषित केल्याने हिंदी लोकांत राष्ट्रभक्तीची भावना निर्माण झाली. स्वदेशी आणि राष्ट्रीय शिक्षणावर आर्य समाजाने भर दिला. स्वामी दयानंद सरस्वती म्हणत कि, ‘टाकाऊतील टाकाऊ स्वराज्य हे परकिय सत्तेपेक्षा अधिक हितकारक असते.’ आर्य समाजाने लाला लजपतराय, स्वामी श्रद्धानंद आणि बिपीनचंद्र पाल यासारखे जहाल देशभक्त हिंदुस्थानला देऊन स्वातंत्र्य चळवळीला अधिक गती दिली.

 • स्वामी दयानंद सरस्वतीच्या आर्य समाजाचे वर्णन भगिनी निवेदिता असे करतात कि, ‘‘आर्य समाज म्हणजे लढाऊ हिंदूधर्म होय.’’
 • डॉ. ॲनी बेझंट असे म्हणतात की, ‘‘हिंदूस्थान हा हिंदूच्यासाठी आहे.’’ असे सांगणारा पहिला महामानव होय.
 • हॉन्स कोहन्स यांच्या मते, ‘‘विसाव्या शतकातील भारताची पायाभरणी आर्य समाजाने केली.’’