आम आदमी विमा योजना

आम आदमी विमा योजना ही ग्रामीण भागातील भूमिहीन कुटुंबातील प्रमुख कमावत्या व्यक्तीला विम्याचे संरक्षण देणारी तसेच शिक्षण घेणाऱ्या पाल्यांना दरमहा शिष्यवृत्ती देणारी योजना आहे. १८ ते ५९ वयोगटातील भूमिहीन कुटुंबातील रोजगार करणारा कुटुंबप्रमुख किंवा त्या कुटुंबातील एक प्रमुख कमावती व्यक्ती यांचा या योजनेअंतर्गत भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून विमा उतरविला जातो.

  • या विम्याची रक्कम केंद्र व राज्य शासनामार्फत प्रत्येकी १०० रुपये याप्रमाणे असे एकूण २०० रुपये प्रती लाभार्थी वार्षिक विमा हप्त्यापोटी आयुर्विमा महामंडळाकडे भरणा करण्यात येते. या योजनेत लाभार्थ्यांना विम्यासाठी कुठलीही रक्कम भरावी लागत नाही.
  • विम्याच्या अंतिम मुदतीपूर्वी सदस्याचा मृत्यू झाल्यास भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून त्याच्या वारसाला ३० हजार रुपये दिले जातात. तसेच सदस्याचा अपघाती मृत्यू झाल्यास ७५ हजार रुपये किंवा अपघातामुळे कायमचे अपंगत्व आल्यास किंवा दोन्ही डोळे व दोन्ही पाय निकामी झाल्यास ७५ हजार रुपये किंवा अपघातामुळे एक डोळा किंवा एक पाय निकामी झाल्यास ३७ हजार ५०० रुपये रक्कम भरपाई म्हणून लाभार्थ्यांला दिली जाते.
  • त्याचबरोबर लाभार्थ्यांच्या ९ वी ते १२ वी इयत्तेत शिकणाऱ्या दोन मुलांना भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून प्रती तिमाही ३०० रुपये इतकी शिष्यवृती देण्यात येते.
  • आम आदमी विमा योजनेकरिता भूमिहीन मजूर, पाच एकरपेक्षा कमी जिरायती व अडीच एकरपेक्षा कमी बागायती शेतजमीन धारण करीत असलेली व्यक्ती भूमिहीन समजण्यात येते