अहमदाबाद कामगारांचा संप (1918)

गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून परतल्यावर सुरुवातीच्या काळातील महत्वाच्या चळवळींपैकी अहमदाबाद कामगारांचा संप ही एक महत्वाची चळवळ होती. १९१८ मध्ये अहमदाबाद येथील गिरणी मालक व कामगार यांच्यामध्ये “प्लेग बोनस” वरून मतभेद झाले. गिरणी मालकांना हा बोनस रद्द करायचा होता तर कामगारांना वेतनामध्ये ५० टक्क्यांची वाढ हवी होती. मात्र गिरणी मालक केवळ २० टक्के वेतनवाढीसाठी तयार होते. या पार्श्वभूमीवर अनूसयाबेन साराभाई आणि अंबालाल साराभाई या गिरणी मालकांनी हा तिढा सोडविण्यासाठी महात्मा गांधीजींना अहमदाबादला बोलावले. अनूसयाबेन साराभाई ही नुकतीच इंग्लंडहून परतली होती व समाजवादी विचारांची होती.

गांधीजींनी गिरणी मालक व कामगार यांच्याशी चर्चा करून गिरणी मालकांना ३५ टक्क्यांची वेतनवाढ देण्याची मागणी केली. मात्र गिरणी मालकांनी त्यास नकार दिला. गांधीजींनी कामगारांना संपावर जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार अहमदाबादमधील सर्व कामगार संपावर गेले. मात्र संपाच्या सात-आठ दिवसांनंतर कामगार कामावर परतू लागले. अशा परिस्थितीत गांधीजी एकाकी पडले. त्यांनी यावर उपाय म्हणून आमरण उपोषण सुरु केले. गांधीजींच्या आमरण उपोषणामुळे गिरणी मालकांवर मोठा दबाव निर्माण झाला. याचाच परिणाम म्हणून गिरणी मालकांनी कामगारांना ३५ टक्के वेतनवाढ देण्याचे मान्य केले.

यानंतर मात्र संपूर्ण देशाचे नेतृत्त्व गांधीजींच्याकडे आले आणि ते सर्वमान्य झाले.