अलंकार

दागिणे किंवा अलंकार माणसाला शोभा देतात, त्याच्या सोंदर्यात भर पडते. त्याप्रमाणे भाषेतही अलंकार असतात व त्याचा योग्य त्या ठिकाणी वापर केल्यास भाषेच्या साैंदर्यातही भर पडते. भाषेला ज्याच्यामुळे शोभा येते अशा शब्दरचनेला अलंकार असे म्हणतात. भाषेच्या अलंकाराचे दोन प्रकार होतात.

 1. शब्दालंकार
 2. अर्थालंकार

शब्दालंकार-

जेंव्हा शब्दांच्या विशिष्ट रचनेमुळे काव्यात साैंदर्य निर्माण होते, अशा अलंकारांना शब्दालंकार असे म्हणतात. शब्दालंकाराच्या जाती पुढीलप्रमाणे आहेत.

१) अनुप्रास

एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरार्वृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेंव्हा त्याला साैंदर्य प्राप्त होते, तेंव्हा अनुप्रास हा अलंकार होतो.  उदा.

१. पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी

देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी

या वाक्यात प, ह, ळ ही अक्षरे पुन्हा पुन्हा आल्यामुळे जो नाद निर्माण होतो, त्यामुळे या वाक्यपंक्तीला शोभा आली आहे.

२. आज गोकुळात रंग खेळतो हरी । राधिके जरा जपुन जा तुझ्या घरी ।

या वाक्यात र आणि ज ही अक्षरे पुन्हा पुन्हा आल्यामुळे जो नाद निर्माण होतो, त्यामुळे या वाक्यपंक्तीला शोभा आली आहे.

 

२) यमक अलंकार

कवितेच्या चरणाच्या शेवटी, मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास यमक अलंकार होतो. उदा.

१. जाणावा तो ज्ञानी

पूर्ण समाधानी

निःसंदेह मनी

सर्वकाळ

अनुप्रासात जशी अक्षरांची पुनरावृत्ती असते तशी यमकातही असते. माञ अनुप्रासात वर्णाची आवृत्ती कोठेही असू शकते, पण यमकातही ही आवृत्ती ठराविक ठिकाणीच होत असते. चरणाच्या शेवटी, मध्ये किंवा ठराविक ठिकाणी.

 • पुष्ययमक-

सुसंगति सदा घडो

सुजन वाक्य कानी पडो

कलंक मतीचा झडो

विषय सर्वथा नावडो

 • दामयमक-

आला वसंत कविकोकिल हाही आला

आलापितो सुचवितो अरूणोदयाला

 

३) श्लेष अलंकार

एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्यामुळे जेंव्हा शब्दचमत्कृती साधते तेंव्हा श्लेष हा अलंकार होतो. उदा

सुनिल ः काय करतोस

अनिल ः काही नाही. पडलोय

सुनिल ः पडलास ? लागल का मग ?

या संवादात पडला या शब्दाचे दोन अर्थ होतात. निवांत पहुडलेले (निजलेले) असणे. आणि दुसरा म्हणजे कुठुन तरी पडणे.

श्लेष म्हणजे आलिंगण किंवा मिठी. एकाच शब्दाला दोन अर्थांची मिठी बसलेली असते, म्हणजे दोन अर्थ चिकटलेले असतात. त्यामुळे एका शब्दाचे दोन अर्थ निघतात. श्लेष हा शब्दालंकार आहे व अर्थालंकार देखील आहे.  उदा.

सूर्य उगवला झाडीत…

झाडूवाली आली रस्ता झाडीत…

शिपाई आले गोळ्या झाडीत..

अन् वाघही आला तंगड्या झाडीत…

उपरोक्त वाक्यामध्ये झाडीत या शब्दावर श्लेष करण्यात आला आहे. श्लेष हा शब्दालंकार आहे व अर्थालंकार देखील आहे.

 • शब्दश्लेष- वाक्यात दोन अर्थ असणाऱ्या शब्दाबद्दल दुसऱ्या अर्थाचा शब्द ठेवल्यास श्लेष नाहीसा झाला तर तो हा शब्दश्लेष होय. उदा.

मिञाच्या उदयाने सर्वांनाच आनंद होतो

हे मेघा, तू सर्वांना जीवन देतोस.

या वाक्यामध्ये मिञ ऐवजी त्याच अर्थाचे दोस्त, सखा हे शब्द ठेवले, किंवा जीवन शब्दाऐवजी पाणी, जल हे शब्द ठेवले, तर त्यातील श्लेष नाहीसा होतो, म्हणून हा शब्दश्लेष होय.

 • अर्थश्लेष- वाक्यात दोन अर्थ असणाऱ्या शब्दाबद्दल दुसऱ्या अर्थचा शब्द ठेवल्यास श्लेष कायम राहिल्यास त्यास अर्थश्लेष म्हणतात. उदा.

तू मलिन, कुटिल, नीरस जड हि पुनर्भवपणेहि कच साच.

या आर्येतील मलिन, कुटिल, नीरस जड हे शब्द बदलून त्याच अर्थाने दुसरे शब्द वापरले तरी श्लिष्ट नाहीसा होत नाही.

 • सभंग श्लेष- शब्दाचे दोन अर्थ आहेत हे लक्षात येण्यासाठी त्या त्या शब्दाची विशिष्ट प्रकारे फोड करावी लागते, यास सभंग श्लेष असे म्हणतात. उदा.

१. श्रीकृष्ण नवरा मी नवरी…

शिशुपाल नवरा मी न-वरी

२.कुस्करू नका ही सुमने….

जरी वास नसे तिळ यांस, तरी तुम्हांस आर्पिली ही सु-मने

 • अभंग श्लेष- शब्द जसाच्या तसा ठेवून त्याचे जेंव्हा दोन अर्थ संभवतात, त्यास अभंग श्लेष म्हणतात. उदा.

ते शीतलोपचारे जागी झाली हळूच मग बोले,

आैषध नलगे मजला, परेसुनी माता बरे म्हणुनी डोले.

 

२. अर्थालंकार

अर्थालंकाराच्या दृष्टीने काही महत्वाच्या संकल्पना-

अ) उपमेय- ज्याची तुलना करावयाची आहे, ते किंवा ज्याचे वर्णन करावयाचे आहे तो घटक.

आ) उपमान- ज्याच्याशी तुलना करायची आहे, किंवा ज्याची उपमा दिली जाते तो घटक.

क) साधारणधर्म- दोन वस्तूंत असणारा सारखेपणा किंवा दोन वस्तूंमधील समान गुणधर्म.

ड) साम्यवाचक शब्द- वरील सारखेपणा दाखविण्यासाठी वापरला जाणारा शब्द.

 

अर्थालंकाराचे प्रकार-

१. उपमा-

दोन वस्तूंतील साम्य चमत्कृतीपूर्ण रितीने जेथे दाखविलेले असते, तेथे उपमा हा अलंकार होतो. उपमेत एक वस्तू दुसऱ्यासारखी आहे असे वर्णन असते. उदा.

 1. मुंबईची घरे माञ लहान….. कबुतराच्या खुराड्यासारखी.
 2. सावळाच रंग तुझा पावसाळि नभापरी
 3. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे

सामान्यतः उपमा अलंकारात सारखा, जसा, जेवि, सम, सदृश्य, गत, परि, समान यांसारखे साम्यवाचक शब्द येतात.

२. उत्प्रेक्षा-

उत्प्रेक्षा म्हणजे कल्पना. ज्या दोन वस्तूंची आपण तुलना करतो, त्यांतील एक(उपमेय) ही जणू काही दुसरी वस्तू(उपमा) च आहे, अशी कल्पना करणे, याला उत्प्रेक्षा अलंकार म्हणतात. उदा.

 1. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू.
 2.  किती माझा कोंबडा मजेदार । मान त्याची किती बाकदार ।                                                                        शिरोभागी तांबडा तुरा हाले । जणू जास्वंदी फूल उमललेले ।।                                                                      अर्धपायी पांढरीशी विजार । गमे विहगांतिल बडा फौजदार ।।
 • उपमेय हे जणू उपमानच आहे, असे जेथे वर्णिलेले असते तेथे उत्प्रेक्षा अलंकार होतो.
 • उत्प्रेक्षा अलंकारात जणू, जणूकाय, गमे, वाटे, भासे, की यांसारखे साम्यवाचक शब्द येतात.

३. रूपक-

उपमेय व उपमान यांच्यात एकरूपता आहे, ती भिन्न नाहीत असे वर्णन जेथे असते, तेथे रूपक हा अलंकार होतो.  उदा.

 1. बाई काय सांगो । स्वामीची ती दृष्टी ।                                                                                                      अमृताची वृष्टी । मज होय ।।                                                                                                                  (स्वामीची दृष्टी व अमृताची वृष्टी ही दोन्ही एकरूपच मानली आहेत.)
 2. ऊठ पुरूषोत्तमा । वाट पाहे रमा ।                                                                                                             दावि मुखचंद्रमा । सकळिकांसि ।।                                                                                                            (येथे मुख व चंद्र ही एकरूप मानून मुखचंद्रमा असा शब्दप्रयोग केला आहे.)
 • उपमेत एक वस्तू दुसर्यासारखी आहे(सादृश्य) असे वर्णन असते.
 • उपमेच्या थोडे पुढे जाऊन उत्प्रेक्षेत त्या दोन वस्तू जवळजवळ सारख्या (एकत्व) केल्याची कल्पना कलेली असते.
 • रूपकात आणखी पुढे जाऊन त्या दोन वस्तू म्हणजे उपमेय व उपमान या एकरूप असल्याचे स्पष्टपणे सांगितलेले असते.

४. अनन्वय-

अनन्वय हे केंव्हा केंव्हा एखाद्या गुणाच्या बाबतीत इतके अद्वितीय असते की त्याला योग्य असे उपमान मिळू शकत नाही. उपमेयाची तुलना उपमेयाशीच करावी लागते.

उपमेयाला दुसऱ्या कशाची उपमा देता येत नसेल, म्हणजे जेंव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते, तेंव्हा अनन्वय अलंकार होतो. अन्वय म्हणजे तुलना. अनन्वय म्हणजे तुलना नसणे. ज्या वाक्यात तुलना करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, तो अनन्वय. उदा.

 1. झाले बहु….होतिल बहु….आहेतहि बहु…परि यासम हा….
 2. आहे ताजमहल एक जगती तो तोच त्याच्यापरि
 3. कर्णासारखा दानशूर कर्णच…

५. अपन्हुती-

अपन्हुती म्हणजे झाकणे किंवा लपवणे. उपमान हे उपमेयाचा निषेध करून उपमानच आहे असे जेंव्हा सांगितले जाते, तेंव्हा अपन्हुती अलंकार होतो. उदा.

 1. न हे नयन, पाकळ्या उमलल्या सरोजातिल ।                                                                                         न हे वदन, चंद्रमा शरदिचा गमे केवळ ।।
 2. आेठ कशाचे….. देठचि फुलल्या पारिजातकाचे
 3. मानेला उचलितो, बाळ मानेला उचलितो ।                                                                                             नाही ग बाई, फणा काढूनि नाग हा डोलतो ।।

६. व्यतिरेक-

व्यतिरेक म्हणजे अधिक्य. उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे, असे वर्णन केलेले असेल तर व्यतिरेक हा अलंकार होतो. उपमेयाचे उपमानावर अधिक्य. हे अधिक्य दोन प्रकारांनी दाखविता येते.

अ) उपमेयाच्या उत्कर्षाने  व   आ) उपमानाच्या अपकर्षाने    उदा.

 1. त ू माउलीहून मयाळ । चंद्राहूनी शीतळ ।                                                                                                पाणियाहूनि पातळ । कल्लोळ प्रेमाचा ।
 2. सावळा ग रामचंद्र । रत्नमंचकी झोपतो ।                                                                                                  त्याला पाहता लाजून । चंद्र आभाळी झोपतो ।
 3. कामधेनूच्या दूग्धाहूनिही आोज हिचे बलवान

७. भ्रांतिमान-

उपमानाच्या जागू उपमेयच आहे असा भ्रम निर्माण होऊन तशी काही कृती घडली तर तेथे भ्रांतिमान अलंकार असतो. कवी ज्याचे वर्णन करत आहे, त्या पाञाच्या मनात निर्माण झालेला भ्रम दाखविण्यासाठी भ्रांतिमान अलंकार वापरला जातो. उदा.

हंसा विलोकुनी सुधाकर अष्टमीचा ।

मानिला निटिलदेश तिचाच साचा ।

शंख-द्वयी धरुनि कुंकुम कीरवाणी ।

लावावया तिलक लांबविला स्वपाणि ।

 अष्टमीचा चंद्र हा दमयंतीचा भालप्रदेश असावा, अशी समजूत करून घेऊन तिच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावण्यासाठी नळ राजाने आपला हात लांब केला.)

 1. भृंगे विराजित नवी अरविंदपञे ।                                                                                                             पाहूनि मानुनी तिचीच विशालपञे ।                                                                                                       घालीन अंजन अशा मतिनें तटाकी ।                                                                                                       कांते वृथा उतरलो, भिजलो विलोकी ।                                                                                                                    (भुग्यांनी सुशोभित झालेली कमलपञे हे दमयंतीचे नेञच आहेत, असे समजून तिच्या डोळ्यात अंजन घालावयास नलराजा पुढे सरसावला व पाण्यामुळे भिजला.)

८. ससंदेह-

भ्रान्तिमान अलंकारात उपमान हे उपमेय आहे असा जो भ्रम होतो, तो निश्चित असतो पण उपमेय कोणते व उपमान कोणते असा संदेह किंवा संशय निर्माण होऊन मनाची जी द्विधा अवस्था होते, त्यावेळी ससंदेह अलंकार होतो. उदा.   चांदण्या राञी पत्नीच्या मुखाकडे पाहताना प्रियकराला वाटले ः

कोणता मानू चंद्रमा? भूवरीचा की नभीचा?

चंद्र कोणता? वदन कोणते?

शशांक-मुख की मुख शशांक ते?

निवडतील निवडो जाणते

मानी परि मन सुखद संभ्रमा-मानू चंद्रमा, कोणता?

९. अतिशयोक्ती-

कोणतीही कल्पना आहे त्याच्यापेक्षा खूप फुगवून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते. त्यावेळी अतिशयोक्ती हा अलंकार हा होतो. उदा.

दमडीच तेल आणलं… सासूबाईच न्हाणं झालं…

मामंजीची दाढी झाली…. भावोजींची शेंडी झाली…

उरल तेल झाकून ठेवलं…. लांडोरीचा पाय लागला…

वेशीपर्यंत आोघळ गेला… त्यात उंट पिहून गेला…

यात असंभ्यावतेची परिसीमा असते. असंभाव्यता किंवा अशक्य गोष्टी शक्य झाल्याचे वर्णन जेथे असते, तेथे अतिशयोक्ती हा अलंकार होतो.

१०. दृष्टान्त-

एखाद्या विषयाचे वर्णन करून झाल्यावर ती गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा एखादा दाखला किंवा उदाहरण दिल्यास दृष्टान्त अलंकार होतो. उदा.

लहानपण देगा देवा ।

मुंगी साखरेचा रवा ।

ऐरावत रत्न थोर ।

त्यासी अंकुशाचा मार ।

उपमेमध्ये सादृश्य दाखिवताना जसे, जेवी, सम, सारखा असे शब्द येतात. माञ दृष्टान्तात सादृश्य दाखविणारे साम्यवाचक शब्द नसतात. हा या दोन अलंकारातील फरक आहे.

न कळता पद अग्नि वरी पडे । न करि दाह असे ना कधी घडे ।

अजित नाम वदो भलत्या मिसे । सकल पातक भस्म करितसे ।

११. अर्थान्तरन्यास-

एखादे सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरणे किंवा विशेष उदाहरणांवरून शेवटी एखादा सामान्य सिद्धांत काढला, तर अर्थान्तरन्यास हा अलंकार होतो. अर्थान्तर म्हणजे दुसरा अर्थ. न्यास म्हणजे शेजारी ठेवणे. अशा प्रकारे एका अर्थाचा समर्थक असा दुसरा अर्थ त्याच्या शेजारी ठेवणे, असा या अलंकाराचा अर्थ आहे. उदा.

बोध खलास न रूचे अहिमुखी दुग्ध होय गरल ।

श्वानपुच्छ नलिकेत घातले होईना सरळ

१२. स्वभावोक्ती-

एखाद्या व्यक्तीचे, प्राण्याचे, वस्तूचे त्याच्या स्वाभाविक स्थितीचे किंवा हालचालींचे यथार्थ पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन जेंव्हा केलेले असते, तेंव्हा त्यास स्वभावोक्ती अलंकार म्हणतात. उदा.

१. मातीत ते पसरले अतिरम्य पंख ।

केले वरी उदर पांडुर निष्कलंक ।।

चंचु तशीच उघडी पद लांबविले ।

निष्प्राण देह पडला श्रमही निमाले ।।

२. गणपत वाणी विडी पिताना…. चावायचा नुसताच काडी…

म्हणायचा अन् मनाशीच की… या जागेवार बांधित माडी…

मिचकावुनी मग उजवा डोळा… आणि उडवुनि डावी भिवई…

भिरकावुनि ती तशीच द्यायचा… लकेर बेचव जैशी गवई…

१३. अन्योक्ती-

अन्योक्ती म्हणजे अन्य व्यक्तीला उद्देशून बोलणे. कित्येक वेळा एखाद्या व्यक्तीला स्पष्टपणे बोलता येत नाही. अशा वेळी ज्याबद्दल बोलायचे, त्याच्याबद्दल काहीच न बोलता दुसऱ्याबद्दल बोलून आपले मनोहत व्यक्त करण्याची जी पद्धत असते, तिलाच अन्योक्ती असे म्हणतात. अर्थात, लेकी बोले सुने लागे अशा प्रकारची पद्धत असते. उदा.

येथे समस्त बहिरे लोक । का भाषणे मधुर तू करिशी अनेक ।।

हे मूर्ख यांस किमपीही नसे विवेक । रंगावरून तुजला गणतिल काक ।।

१४. पर्यायोक्त-

एखादी गोष्ट सरळ शब्दांत न सांगता अप्रत्यक्ष रितीने किंवा आडवळणाने सांगणे, यांस पर्यायोक्त असे म्हणतात. उदा.

१. त्याचे वडील सरकारचा पाहुणचार घेत आहेत.

२. काळाने त्याला आमच्यातून हिरावून नेले.

३. माझ्या उत्तरपञिकेवर खूश होऊन परिक्षकांनी मला वन्स मोअर दिला आहे.

१५. विरोधाभास-

एखाद्या विधानावर वर वर दिसायला विरोध आहे, असे वाटते, पण वास्तविक तसा विरोध नसतो, अशआ ठिकाणी विरोधाभास हा अलंकार असतो. उदा.

 1. वियोगार्थ मीलन हाते नेम हा जगाचा ।
 2. जरी आंधळी मी तुला पाहते .
 3. स्वतासाठी जगलास तर मेलास… दुसर्यासाठी जगलास तरच जगलास
 4. सर्वच लोक बोलू लागले की कोणीच ऐकत नाही.

१६. सार-

एखाद्या वाक्यातील कल्पना चढत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधलेला असतो, तेंव्हा सार हा अलंकार असतो. उदा.

आधीच मरकट तशातही मद्य प्याला… झाला तशात जरी वृश्चिक दंश त्याला…

झाली तयास तदनंतर भूतबाधा… चेष्टावधू मग किती कपिच्या अगाधा…

१७. चेतनगुणोक्ती-

निसर्गातील निर्जीव वस्तू सजीव आहेत, अशी कल्पना करून ती मनुष्याप्रमाणे वागतात किंवा कृती करतात, असे जेथे वर्णन असते, तेथे चेतनगुणोक्ती हा अलंकार होतो. उदा.

कुटुंबवत्सल्य इथे फणस हा । कटिखांद्यावर घेवूनि बाळे ।

कथिते त्याला कुशल मुलांचे । गंगाजळीचे बेत आगळे ।

१८. व्याजस्तुती-

बाह्यतः स्तुती पण आतून निंदा किंवा बाह्यतः निंदा पण आतून स्तुती असे जेथे वर्णन असते, तेथे व्याजस्तुती हा अलंकार होतो. उदा.

काय विद्वान आहेस रे तू !

केवढा उदार रे तू !

१९. व्याजोक्ती-

एखाद्या गोष्टीचे खरे कारण लपवून दुसरेच कारण देण्याचा जेथे प्रयत्न केला जातो, तेथे व्याजोक्ती हा अलंकार होतो. उदा.

१.  येता क्षण वियोगाचा पाणी नेञांमध्ये दिसे ।

डोळ्यांत काय गेले हे ? म्हणूनी नयना पुसे ।।

२. काय गे बघशी मागे वळूनी अशी ?

विचारिता म्हणे, माझी राहिली पिशवी कशी ?

मित्रांसोबत शेयर करा.

Leave a comment

Your email address will not be published.

error: