अर्थसंकल्पातील महत्वाच्या संकल्पना

अर्थसंकल्पाला इंग्रजीमध्ये बजेट हा शब्द आहे. बजेट या शब्दाचे मुळ जुन्या फ्रेंच भाषेतील bougette या शब्दात आहे. फ्रेंच भाषेत त्याचा अर्थ चामड्याची पिशवी (leather purse)असा आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम ११२ नुसार वार्षिक वित्तीय विवरणपञ(अर्थसंकल्प) संसदेमध्ये मांडले जाते. अर्थसंकल्प समजण्यासाठी अर्थसंकल्पातील महत्वाच्या संकल्पना माहीत असणे आवश्यक आहे. अर्थसंकल्पाच्या बाबतीत तीन महत्वाच्या संकल्पना आहेत. या संकल्पना म्हणजे-

 1. जमा (Receipts)
 2. खर्च (Expeniture)
 3. तूट (Deficit)

जमा (Receipts)

विविध मार्गांनी सरकारने उभारलेला महसूल म्हणजे जमा होय. याचे दोन प्रकार आहेत

महसूली जमा

महसूली जमा या प्रकारामध्ये कर महसूल व करेतर महसूल यांचा समावेश होतो. महसूली जमा सरकारचे उत्पन्न असते म्हणून सरकारवर महसूली जमेमुळे दायित्व निर्माण होत नाही.

कर महसूल

म्हणजे सरकारला सर्व प्रकारच्या(प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष) करांतून प्राप्त होणारा महसूल.

करेतर महसूल

यामध्ये सरकारला कराव्यतिरिक्त प्राप्त होणार्या महसूलाचा समावेश होतो. उदा.

 1. सार्वजनिक उपक्रमांकडून मिळणारा नफा व लाभांश
 2. सरकारने देऊ केलेल्या कर्जावरील व्याजाचे उत्पन्न
 3. वित्तीय सेवांतून मिळणारे उत्पन्न उदा.चलन, छपाई, इ.
 4. सर्वसाधारण सेवांतून मिळणारे उत्पन्न उदा, विद्युतनिर्मिती, सिंचन, बॅंकिंग, विमा, इ.
 5. दंड व फी च्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न

भांडवली जमा

सरकारच्या सर्व बिगर महसूली जमांचा समावेश भांडवली जमेत होतो. यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश असतो.

कर्जउभारणी

यामध्ये सर्व अंतर्गत व बाह्य कर्जांचा समावेश असतो. अंतर्गत कर्जे ही रिझर्ह बॅंक, भारतीय बॅंका व वित्तीय संस्थांकडून घेतलेली असू शकतात. बाह्य कर्जे ही जागतिक बॅंक, IMF, परकीय सरकार व परकीय वित्तीय संस्थांकडून घेतलेली असू शकतात.

कर्जाची वसूली

सरकारने देऊ केलेल्या अंतर्गत व बाह्य कर्जाच्या मुद्दलाच्या वसूलीचा यात समावेश होतो.

इतर भांडवली जमा

यामध्ये नागरिकांनी भविष्य निर्वाह निधी, पोस्टातील ठेवी, शासनाच्या अल्प बचत योजना यामध्ये गुंतवलेल्या पैशांचा समावेश होतो. हा पैसा सरकारला काही काळानंतर व्याजासकट परत करावा लागतो. याशिवाय सार्वजनिक उपक्रमांमध्ये निर्गुंतवणूक करून ही सरकारकडे भांडवली जमा प्राप्त होते.


खर्च

अर्थसंकल्पातील खर्चाचे दोन प्रकार पडतात.

महसूली खर्च

सरकारला आपली यंञणा चालविण्यासाठी येणाऱ्या खर्चाला महसूली खर्च असे म्हणतात. या खर्चाचे स्वरूप उपभोगात्मक असून या खर्चातून कोणतीही उत्पादक संसाधने निर्माण होत नाहीत. या खर्चाचे स्वरूप म्हणजे हा अनिवार्य स्वरूपाचा खर्च असतो. यात पुढील बाबींचा समावेश होतो.

 1. सरकारने घेतलेल्या अंतर्गत व बाह्य कर्जावरील व्याज
 2. सरकारी कर्मचाऱ्याचे वेतन, निवृतीवेतन व भविष्यनिर्वाह निधी
 3. सरकारने दिलेली सर्व अनुदाने(सबसिडी)
 4. संरक्षण खर्च
 5. कायदा व सुव्यवस्थेवरील खर्च
 6. सामाजिक सेवांवरील खर्च उदा. शिक्षण, आरोग्य, इ.
 7. करवसूलीचा खर्च

भांडवली खर्च

भांडवली खर्च हा वस्तू व सेवांचा प्रवाह सतत चालू ठेवण्यासाठी आणि समाजाचे भांडवल जतन करण्यासाठी केला जातो. बहुउद्देशीय प्रकल्प उभारणे, लोखंड-पोलाद, सिमेंट, अणूशक्ती इ. साठी केला जाणारा खर्च भांडवली खर्च म्हणून ओळखला जातो. देशाची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी भांडवली खर्च अत्यंत महत्त्वाचा ठरतो. म्हणून त्यास विकास खर्च असेही म्हणतात. सरकारच्या भांडवली खर्चात पुढील बाबींचा समावेश होतो.

 1. सरकारने देऊ केलेली कर्जे.
 2. सरकारने पूर्वी घेतलेल्या कर्जाची परतफेड
 3. सरकारचा योजना खर्च
 4. सरकारने संरक्षण क्षेत्रावर केलेला भांडवली खर्च
 5. सामान्य सेवांवर सरकारने केलेला भांडवली खर्च उदा. रेल्वे, पोस्ट इ.
 6. सरकारचे इतर दायित्व.